जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल कवडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बोलावलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीला केवळ एका आमदाराने हजेरी लावली. अन्य इच्छुकांपैकीही कोणी या बैठकीकडे फिरकले नाही.
 विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर कवडे यांनी शनिवारी राजकीय पक्षांची पहिली बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदारांपैकी केवळ विजय औटी उपस्थित होते. बैठकीला हजर राहून निवडणुकीची सर्व प्रक्रिया त्यांनी समजून घेतली. जिल्ह्य़ातील बारा मतदारसंघांतून सर्व पक्षांकडे किमान ५० जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यापैकीही कोणी या बैठकीकडे फिरकले नाही. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा कोषाधिकारी विजय कोते, उपजिल्हाधिकारी अरुण डोईफोडे, नगरचे उपविभागीय अधिकारी वामन कदम आदी या वेळी उपस्थित होते.
कवडे यांनी या वेळी निवडणुकीची मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली. मुख्यत्वे उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत, खर्चाचा हिशोब आदी गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल, त्याद्वारेच निवडणुकीचा खर्च करावा लागेल. दर तीन दिवसांनी निरीक्षकांकडे त्याचा हिशोब सादर करावा लागेल, आदी गोष्टी कवडे यांनी स्पष्ट केल्या.
तत्पूर्वी कवडे यांनी जिल्ह्य़ातील सर्व सरकारी खातेप्रमुखांचीही निवडणूक नियोजनाबाबत बैठक घेतली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्य़ात निवडणूक पक्रिया निष्पक्षपाती व पारदर्शी होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असेही आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा