जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी मान्सूनने यंदाच्या हंगामाला विजांच्या कडकडाटासह जोरदार सुरूवात केली. नाशिकमध्ये खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने पात्रात उभी असलेली वाहनं पाण्यात अडकली. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करतांना कसरत करावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिकडेच ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जिल्ह्याच तडाखा बसला होता. त्यावेळी अनेक भागात वादळी पाऊस झाला. त्यानंतरही अधुनमधून पावसाने हजेरी लावली. पण, सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे होते. दोन दिवसात उकाडा वाढला होता. शुक्रवारी पहाटेपासून त्याचे अस्तित्व अधोरखीत झाले. भल्या पहाटे मनमाड शहर, परिसरात मुसळधार पाऊस झाला. दुपारी त्याचे नाशिक शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह आगमन झाले. तासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागात ठिकठिकाणी तळे साचले.

टाळेबंदी शिथील होत असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असताना, अचानक सरी कोसळू लागल्याने नागरिकांसह छोट्या विक्रेत्यांची धावपळ उडाली. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. गोदावरीच्या पातळीत वाढ झाल्याने शहरातील गाडगे महाराज पुलाजवळ पात्रात उभ्या असलेल्या  दहा कार आणि दोन मालवाहू वाहनं पाण्यात अडकली. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. द्वारकालगतच्या काशीमाळी मंगल कार्यालयालगतच्या परिसरात पाणी शिरले. अग्निशमन विभागाने धाव घेत पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था केली.  गोदावरीच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने गाडगे महाराज पुलाजवळ पात्रात उभी असलेली वाहने अडकली होती. अग्निशमन दलाने धाव घेऊन ती वाहने बाहेर काढली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presence of heavy rain in nashik the level of godavari increased msr