|| दिगंबर शिंदे

अधिक उत्पादन देणाऱ्या नवनव्या भाताची लागवड वाढल्याने पारंपरिक पण पौष्टिक, रोगप्रतिकारशक्ती असलेले भाताचे वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीमध्ये पारंपरिक वाणांचे जतन करण्याबरोबरच त्याचे संवर्धन आणि विक्री व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न सध्या शिराळा तालुक्यात सुरू आहे. याच उपक्रमाविषयी….

सांगली जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखला जाणारा शिराळा तालुक्याच्या वारणा खोऱ्यातील पश्चिम भाग आजही भात पिकांसाठी प्रसिद्ध असला तरी बदलत्या काळात नव-नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या भाताची लागवड वाढल्याने पारंपरिक पण पौष्टिक, रोगप्रतिकार शक्ती असलेल्या भाताचे वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीमध्ये पारंपरिक वाणांचे जतन करण्याबरोबरच त्याचे संवर्धन आणि विक्री व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भाताच्या पारंपरिक १२ जातींची पैदास आणि बियाणांच्या संवर्धन तालुक्याच्या पश्चिम भागात या वर्षी करण्यात आले.

रोजच्या जेवणात भात असल्याविना पोटच भरले नाही असे म्हणणारे अनेक जण भेटतील. रोजच्या जेवणात भात असला तरी प्रत्येक भाताचा गंध, चव, रंग वेगवेगळा असतो. खाल्ल्यानंतरच त्याची चव, गंध रेंगाळतो. मात्र, भाताला नैसर्गिक लाभत असलेला गंध आणि चव ही कितीही मसाल्यांचा वापर केला तरी प्राप्त होत नाही. निसर्गातूनच भाताला मिळणारा गंध आणि चव हवी असते. प्रत्येक गावानजीक जशी माती, हवा, पाणी बदलत असते तसा भाताचा गंध आणि चव बदलत असते.

अलिकडच्या काळात आपल्या मातीचा गंध उपजत बाळगणाऱ्या भाताचे वाण दुर्मीळ होत चालले आहे. भरमसाठ उत्पादन, बाजारातील दराची हमी, आणि चवीपेक्षा पोटभरू उत्पादनाला महत्त्व आल्याने नवनवीन जाती विकसित झाल्या. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या आणि रोगांना लवकर बळी न पडणाऱ्या भाताची लागवड वाढल्याने साहजिकच पारंपरिक वाण नष्ट होण्याच्या मार्गावर आले. राज्यात भाताखालील लागवड क्षेत्र १४.९२ लाख हेक्टर असून यापैकी शिराळा तालुक्यामध्ये १२ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. भाताची सरासरी उत्पादकता हेक्टरी १ हजार ६६१ किेलो असून उत्पादन खर्च न वाढवता हेक्टरी ३ हजार किलो उत्पादन तेही आरोग्यदायी सेंद्रिय देशी वाणाचे हे उदिष्ट समोर ठेवून या वर्षी २५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली.

शिराळा तालुक्याचा म्हणजेच वारणा खोऱ्याचा भाग हा रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला जवळचा आहे. यामुळे साहजिकच या पश्चिम घाटाच्या प्रदेशात पाउसमान मुबलक आहे. शिराळा ताह्क्याचे वार्षिक पर्जन्यमान ९५० मिलीमीटर असले तरी पश्चिम घाटातील पर्जन्यमान २ हजार मिलीमीटरपेक्षा अधिक असते. यामुळे या भागात भात पिकाशिवाय अन्य पिकांची स्थिती फारशी चांगली राहू शकत नाही. तसेच या परिसरातील माती तांबूस, करडी असल्याने याचे गुण पिकामध्ये उतरतात. जमीन डोंगरउताराची आणि प्रदेश अति पर्जन्यमानाचा असल्याने भातापिकाविना पर्यायच नाही अशा ठिकाणी भाताची लागवड करण्यासाठी कोकरूडजवळच्या पतवारूण या गावाची निवड करण्यात आली. वैशाख वणवा संपला की, पडणाऱ्या उन्हाळी पावसानंतर धूळवाफेवर भात लागण केली जाते, तर कधी टोकण तर कधी रोपलावणीने भात लागवड केली जाते.

अलिकडच्या काळात अधिक उत्पन्न देणाऱ्या नवीण भाताची लागण करण्याचे प्रमाण वाढल्याने इथल्या मातीचा गंध आणि चव देणारी भाताची जात नामशेष होण्याची वेळ आली होती. जिल्हयाच्या पूर्व भागातील खानापूर घाटमाथ्यावरच्या गहू, ज्वारीसारखी अवस्था भाताची होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पारंपरिक जातींचे संवर्धन आणि जपणूक करण्यासाठी कृषी विभागाचे अधीक्षक मनोज वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अधिकारी जे. एस. पाटील, मंडळ अधिकारी अरविंद शिंदे, पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर आदींनी देशी व आरोग्यवर्धक भात वाणाची लागवड करण्याचा प्रयोग हाती घेतला. रासायनिक घटकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उत्पादन खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त आणि पर्यावरणपूरक पीक लागवडीचा प्रयोग आहे. यासाठी शिराळा तालुक्यातील पतवारून गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून पारंपरिक वाणाचे महत्त्व सांगण्याबरोबरच त्याची बाजारातील किंमतही सांगितली. यासाठी ज्योतिर्लिंग शेतकरी गटाची धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. यामध्ये दगडू विभुते, संभाजी पाटील, सुनील विभुते, विजय विभुते, सचिन तेली, महादेव पाटील, नाना ढेरे आदी वीसहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

या गटामार्फत दहा हेक्टरवर पारंपरिक वाणाची लागवड करण्यात आली. यामध्ये षेष्ठी शाळी, रक्तशाळी, झिंक भात, काळी गजेली, आसाम बासमती, र्गोंवद भात, काळे भात, कोल्हयाचे शेपूट, तुळशी भात, रत्ना-सात, मासाड भात आणि जोंधळा जिरगा या बारा जातींची संवर्धनासाठी निवड करण्यात आली. यापैकी काही जाती स्थानिक पातळीवर अजूनही उपलब्ध आहेत, तर ज्या जाती उपलब्ध नाहीत त्या कण्हेरी मठ, कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविण्यात आल्या. दहा हेक्टवर लागवडीचे उदिष्ट निश्चित करण्यात आले. प्रत्येक जातीचे वैशिष्टे, रंग, आकार, गंध, रोग प्रतिकारकता वेगवेगळी असून त्याचे उत्पादनही वेगवेगळे आहे.

काही जाती धूळवाफेवर केल्या तर चालतात, तर काही जाती रोपलागणीनेच कराव्या लागतात, तर काही जाती टोकण पद्धतीने लागवड केली तर चालते. मात्र, टोकण आणि रोपलागण करीत असताना दोन रोपातील अंतर सहा इंच बाय नऊ इंच असेल तर फुटवा चांगला जोमदार येतो. या पद्धतीने शेतकरी गटाच्या बैठका घेउन प्रबोधन करण्यात आले.

यापैकी रक्तशाळी या वाणाचा भात रक्तशुद्धीबरोबरच मधुमेही रुग्णांना उपकारक तर आहेच, पण सांधेदुखीपासून मुक्ती देणाराही आहे, तर षेष्ठीशाळी वाण सुगंधित असून झिंक भात गर्भवती माता, स्तनदा मातांना पोषक आणि कॅल्शयिमची उणिव भासू न देणारा आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या भातांना चांगली मागणीही आहे. मात्र उत्पादनच कमी असल्याने अपेक्षित पुरवठा होत नाही. स्थानिक पातळीवर याचे महत्त्वही ज्ञात नसल्याने आणि विक्री व्यवस्था नसल्याने या पारंपरिक वाणांकडे दुर्लक्ष होत गेले. या वाणाचे उत्पादन प्रति गुंठा पन्नास ते ऐंशी किलोपर्यंत मिळते. यामुळे पुन्हा या पिकाकडे शेतकरी वळू लागला आहे. 

‘विकेल ते पिकेल’ या योजनेतून भाताच्या आरोग्यवर्धक देशी वाणाचे संवर्धन करण्याबरोबरच उत्पादकता वाढविणे हा उद्देश समोर ठेवून हा प्रयोग हाती घेण्यात आला. स्थानिक पातळीवर असलेल्या नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून हवा, पाणी आणि माती याचा साकल्याने विचार करून पश्चिम घाटातील अतिपर्जन्यवृष्टी असलेल्या शिराळा तालुक्यातील पतवारूण या गावाची निवड करण्यात आली. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले असून याचा  निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होत आहे. – मनोजकुमार वेताळ, जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली.

महानगरातील मॉलमध्येही आकर्षक वेस्टनामधून पारंपरिक वाण विक्रीसाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या तांदळाचा मॉलमध्ये विक्री किलोला १०० रूपयापासून १३० रूपयांपर्यंत असून याचा निश्चितच फायदा शेतकरी उत्पादकांना मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  – गणेश क्षीरसागर, कृषी पर्यवेक्षक.

ज्याला चवीचं हवं तो, त्यासाठी जास्त मोल मोजायलाही तयार आहे हे आता आम्हाला कळायला लागले आहे. आमच्या भागातील मातीचा, पाण्याचा गंध असलेला भात पुन्हा एकदा दिमाखाने शहरातील माणसांच्या जिभेवर आपली चव रेंगाळयला सिध्द झाला आहे याचा निश्चितच आनंद आहे.  – धनाजी पाटील, शेतकरी,

digambar.shinde@expressindia.com

Story img Loader