राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनैश्वराचं दर्शन घेतलं. मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन शनैश्वराच्या मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी त्यांच्याबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार शिवाजीराव लोखंडे उपस्थित होते. महिलांना पूर्वी शनिशिंगणापूर येथे देवाची मूर्ती असलेल्या चौथऱ्यावर जाण्यास बंदी होती. परंतु, राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेलाचा अभिषेक केला. ही एक नवी सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी (२९ नोव्हेंबर) त्यांनी लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रपतींनी ‘शालेय शिक्षणात योगाचा समावेश’ या विषयावर चर्चासत्राला संबोधित केले. यावेळी मुर्मू यांच्याबरोबर राज्यपाल आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. त्यापाठोपाठ आज त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडचे निरीक्षण केले. यावेळी त्यांच्याबरोबर राज्यपाल आणि संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा >>“कोकणात मंत्रिमंडळ बैठकीची आवश्यकता…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; ठाकरे गटावर टीका करत म्हणाले…
पुण्यात आजी-माजी राष्ट्रपतींची अनोखी भेट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच पुण्यात आल्याने प्रतिभा पाटील यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं. तसेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आणि शाल देऊन गौरवलं. यावेळी पाटील यांनी प्रताप परदेशी आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या ‘बाल रक्षण कायद्याचे (पोस्को) अंतरंग’ या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुर्मू यांना प्रदान केली.