राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पहिल्याच शिर्डी दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिर्डीकरांमध्ये या दौऱ्याबाबत कमालीचा उत्साह आहे. या दौऱ्यासाठी तैनात करण्यात आलेल्या विविध सरकारी खात्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र ऐन दिवाळीत शिर्डीत मुक्काम ठोकावा लागणार आहे. त्यांची दिवाळीच घरापासून दूर शिर्डीत साजरी होईल.  
चेन्नई येथील शिर्डी साई ट्रस्ट या संस्थेच्या वतीने श्री साईबाबा देवस्थानने शिर्डीत दिलेल्या जागेवर साई आश्रम हे भव्य भक्त निवास बांधण्यात आले आहे. तब्बल ११० कोटी रूपयांच्या देणगीतून हे भक्त निवास उभे राहिले आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दि. १६ नोव्हेंबरला होत असून, या दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर बंदोबस्तासाठी नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यातून ३५० पोलीस कर्मचारी व अधिकारी, तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नगरचे पोलीस अधीक्षक, ४ अतिरिक्त अधीक्षक, १० उपाधीक्षक, ५० निरीक्षक, ८५ उपनिरीक्षक, १ हजार १०० कर्मचारी, ५० वाहने तैनात करण्यात आली असून, पोलीस यंत्रणेबरोबरच राज्य व केंद्रीय गुप्तचर विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, महसूल, राजशिष्टाचार या विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या दौऱ्यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत.
दि. १३ ला लक्ष्मीपूजन असून त्याच दिवशी सायंकाळपासून नेमणुका करण्यात आल्या आहेत. या सर्वाना तोपर्यंत शिर्डीत दाखल होण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. दि. १६ला राष्ट्रपतींचा दौरा संपेपर्यंत या सर्वाचा तळ शिर्डीत असणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या सर्वाची पूर्ण दिवाळीच राष्ट्रपतींच्या तैनातीत जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारचे काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आत्ताच शिर्डीत दाखल झाले आहेत.
या दौऱ्यामुळै शिर्डीतील रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, हा दौरा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र पर्वणी ठरणार आहे. शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून पाठीमागून पुन्हा हे खड्डे उखडले जात आहेत. राष्ट्रपतींचाच दौरा असल्यामुळे बिलांचीही अडचण येणार नाही.     

Story img Loader