९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार होते. मात्र, आता राष्ट्रपती कोविंद हे २४ एप्रिल रोजी व्हिडीओच्या माध्यमातूनच संदेश देणार आहेत. यासंदर्भातील माहिती राष्ट्रपतींचे खासगी सचिव पी. प्रवीण सिद्धार्थ यांनी मराठवाडा एज्युकेशन सोसायटी संचलित उदयगिरी महाविद्यालयाचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उदगीर दौरा अखेर रद्दच झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यासंदर्भात प्रवीण सिद्धार्थ यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये काही टाळता न येणाऱ्या कारणांमुळे राष्ट्रपती संमेलनात उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या कामामुळे राष्ट्रपतींना येता येणार नसल्याचं देखील या पत्रात नमूद केलं आहे.

उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडाच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला असून साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत महाविद्यालयाच्या सुमारे ३६ एकरच्या परिसरात संमेलन साजरे होणार आहे.

साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथिदडीने होणार असून यंदाच्या ग्रंथिदडीची तीन खास वैशिष्टय़े आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या एका ग्रंथिदडीचे नेतृत्व दुचाकीवर स्वार असणारे महिलांचे पथक करणार आहे. या पथकात घोडेस्वारी करणाऱ्या महिलाही असणार आहेत. ग्रंथिदडीचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे ‘गुगलविधी’ असून कर्नाटकातील ‘गुगल’ नृत्यप्रकारानुसार विवाहापूर्वी वाजत गाजत, नृत्य करत देवतेची पूजा करण्यात येते. हा विधी ग्रंथिदडीत अनुभवायला मिळणार आहे. मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी ‘नवरंग’ दिंडी हे तिसरे वैशिष्टय़ असणार आहे. पाचशे  शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. यासह ढोल, लेझीम, वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे १५० कलावंत ग्रंथिदडीत सहभागी होणार आहेत.