रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती जांभळे यांच्या दालनात झालेला राडा प्रकरणातील एक आरोपी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी हात वर केले असून, राडा झाला तेव्हा आपण दालनात नव्हतो असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. हा सर्व जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा स्टंट असून आपल्याबाबत राजकारण होत असल्याचे ते म्हणाले. २५ एप्रिल रोजी गजानन लेंडी याने साक्षीदारांसह जितेंद्र चिर्लेकर याला संजय जांभळे यांच्या दालनात मारहाण केली होती. जितेंद्र चिर्लेकर याला २४ एप्रिल रोजी मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय जांभळे यांच्यावर आहे. या प्रकरणात जांभळे यांना २६ एप्रिल रोजी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. २७ एप्रिल रोजी न्यायालयाने जांभळे यांची जामिनावर मुक्तता केली आहे. जामिनावर मुक्त झाल्यानंतर त्यांनी अलिबाग येथे आज पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले. यावेळी शिवसेना जिल्हा परिषद प्रतोद उत्तम कांबळे, स्वीकृत सदस्य राजेश जाधव, अलिबाग शहर प्रमुख कमलेश खरवले उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत झालेला राडा हा अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाद आहे. २३ एप्रिल रोजी एका भविष्य निर्वाह निधी योजनेच्या प्रकरणात ग्रामपंचायत विभागातील कक्ष अधिकारी गजानन लेंडी व वरिष्ठ साहाय्यक जितेंद्र चिर्लेकर यांच्यात अर्थ विभागातील वाद झाला होता. या वादाची विचारणा करण्याकरिता आपण २४ एप्रिल रोजी चिर्लेकर याला फोन केला होता. यावेळी आपण चिर्लेकर याला कोणतीही धमकी दिली नसल्याचे जांभळे यांनी सांगितले.
२५ एप्रिल रोजी गजानन लेंडी व जितेंद्र चिर्लेकर यांना वाद करू नका असे समजाविण्यासाठी बोलाविले. मात्र दालनात आल्यानंतर गजानन लेंडी व जितेंद्र चिर्लेकर यांच्याच बाचाबाची झाली. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना शिवीगाळही केली. या दोघांना दालनाच्या बाहेर जाण्यास सांगून, आपण बाथरूममध्ये गेलो. परत आल्यानंतरही त्यांच्यात बाचाबाची सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण हे भांडण सोडविले. मात्र आपल्यासमोर हाणामारी झाली नसल्याचे संजय जांभळे यांनी सांगितले.
गजानन लेंडी यांनी बाहेरून माणसे आणून जांभळे यांच्या दालनात चिर्लेकर याला मारहाण केल्याचा आरोप आहे. आपल्या दालनात नेहमी शेकडो नागरिक आपापल्या कामासाठी येत असतात. त्यामुळे कोण नेमक्या कोणत्या उद्देशाने आलेय ते ओळखणे कठीण असल्याचे जांभळे यांनी सांगितले.
गजानन लेंडी व जितेंद्र चिर्लेकर यांच्यात झालेला वाद निंदनीय आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी कारवाई करून त्यांना निलंबित करावे. याआधी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे, यावेळी त्यांची कर्मचारी संघटना कुठे गेली होती, असा खोचक प्रश्नही संजय जांभळे यांनी उपस्थित केला.
जितेंद्र चिर्लेकर यांना जर मी २४ एप्रिल रोजी मारण्याची धमकी दिली होती तर २५ एप्रिल रोजी या वादानंतर ते जांभळेसाहेबांनी मला वाचविले असे सारखे का सांगत होते? हा प्रश्न विचारून चिर्लेकर यांची हे सांगत असतानाची चित्रफीतही आपल्याकडे असल्याचे जांभळे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा