तुकाराम झाडे

हिंगोली : कापूस आणि उसापेक्षाही हळद या वर्षी दरांमध्ये उजवी ठरत असून या वेळी वसमत बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या हळदीला नऊ हजार ६०० रुपये दर मिळाला असून अन्य शेतकऱ्यांनाही आठ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला आहे. या वर्षी कापासालाही आठ हजार २०० रुपये भाव मिळत असून उसाचा भाव १८०० ते २२०० रुपये टन आहे. पिकांचे भाव चांगले असताना आता त्यात हळद उजवी ठरू लागली आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीला आठ हजार ५०० रुपये प्रतििक्वटल भाव मिळाला असून दिवसभरात दोन हजार िक्वटलवर हळदीची आवक झाली. जिल्ह्यात यावर्षी हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळद उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात हिंगोलीसह परजिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात हळद विक्रीला येते. हळदीची उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून बाजार समितीच्या मार्केट यार्डची दूरवर ओळख झाली असल्याने हळद खरेदीसाठी परराज्यातून व्यापारी येतात. हिंगोलीप्रमाणेच वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा हळद विक्रीला येते. सेनगाव येथे खासगी संत नामदेव कृषी बाजार येथे हळदीची खरेदी होते.