प्रकाशकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजल्या जाणाऱ्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीवरून सध्या दोन प्रकाशकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. आता त्यात भर पडली आहे ती, या पुस्तकाच्या किमतीवरून सुरू असलेल्या शीतयुद्धाची. त्यामुळे मूळ ४५० रुपये किंमत असलेली ही कादंबरी वाचकांसाठी बाजारात ३०० रुपयांना उपलब्ध झाली आहे, तर पुस्तक विक्रेत्यांसाठी ती फक्त दोनशे रुपयांनाच वितरित केली जात आहे.
दिवंगत साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यविश्वात इतिहास घडवला. महाभारतातील कर्ण नायक असलेली ही कादंबरी पुण्याच्या ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’ने १९६६ मध्ये प्रसिद्ध केली. तिची लोकप्रियता आजही कायम आहे. या कादंबरीचे १४ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. अलीकडेच या कादंबरीच्या हक्कावरून वाद सुरू झाले आहेत. सावंत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी त्यांच्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’ व ‘युगंधर’ या पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेकडे दिले. त्यावरून आता कॉन्टिनेन्टल प्रकाशन आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे.
‘मेहता’ यांनी २ मार्च रोजी ही कादंबरी बाजारात आणली. त्या वेळी त्यांनी या कादंबरीची किंमत पाडली. ‘कॉन्टिनेन्टल’च्या मूळ कादंबरीची ४५० रुपये किंमत असताना ‘मेहता’ यांनी तिची किंमत ३७५ रुपये ठेवली, प्रकाशनपूर्व सवलतीच्या दरात ती ३०० रुपयांना दिली. न्यायालयीन लढाई अद्याप सुरू असल्याने ‘कॉन्टिनेन्टल’कडूनही या पुस्तकाची विक्री सुरू आहे. त्यांनी किंमत आणखी कमी करून वाचकांसाठी ३०० रुपयांना ही कादंबरी उपलब्ध करून दिली आहे.पुस्तक विक्रेत्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीतही अशीच स्पर्धा सुरू आहे. ‘मेहता’कडून विक्रेत्यांना २५ प्रती घेतल्यास ही कादंबरी २३५ रुपयांना दिली गेली, तर ‘कॉन्टिनेन्टल’ने ही किंमतही आणखी खाली उतरवून २०० रुपयांवर आणली आहे. याबाबत ‘कॉन्टिनेन्टल’चे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी सांगितले की, शिवाजी सावंत यांच्या पुस्तकांबाबत प्रकरण अद्याप लवादापुढे सुरू झालेले नाही. त्यामुळे ‘कॉन्टिनेन्टल’ला या पुस्तकांच्या अधिकाराबाबत कोणतीही मनाई केलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा