अलिबाग : रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात दाखल झाला आहे. सध्या लहान कांदा प्रति माळ २०० रुपये, तर मोठा कांदा प्रति माळ २८० रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग तालुक्यात प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. आता अलिबाग तालुक्यातील इतरही गावांमध्ये या कांद्याची लागवड केली जाऊ लागली आहे. त्यामुळे पांढरा कांदा लागवडीखालील क्षेत्र १०० हेक्टर वरून २४५ हेक्टरपर्यंत वाढले आहे.

रायगड जिल्ह्यात भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने पांढरा कांद्याची लागवड केली जात आहे. या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. राज्यातील इतर कुठल्याही भागात पिकणाऱ्या कांद्यापेक्षा येथील पांढऱ्या कांद्याला जास्त दर मिळतो. त्यामुळेच या कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.

हेही वाचा >>> ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम

यंदा जिल्ह्यात कांद्याचे पीक जोमाने आले आहे. पांढऱ्या कांद्याचा आकार मोठा असल्याने त्याला चांगला दरही मिळत आहे. सुरुवातीला ३५० रुपये दराने कांद्याची माळ विकली गेली. आता बाजारात आवक वाढल्याने लहान कांदा २०० रुपये माळ, तर मोठा कांदा २८० रुपये प्रती माळ दराने पांढरा कांदा विकला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसांत आणखी कांदा बाजारात दाखल होणार असल्याने दर काही कमी होतील, अशी अपेक्षा आहे. सध्या अलिबाग-पेण मार्गावर मोठ्या प्रमाणात या कांद्याची विक्री केली जात आहे.

औषधी गुणधर्म

अभ्यासकांच्या माहितीनुसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाइल सल्फाइड आणि अमीनो ॲसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

यावर्षी अवकाळी पावसाचा फारसा त्रास झाला नाही. हवामानाने देखील चांगली साथ दिली. त्यामुळे यावर्षी भरघोस उत्पादन आले आहे. कांद्याला मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा प्रथमच ओडिशामधून एक टन कांद्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. – सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी