उन्हाळी कांद्याची घटणारी आवक आणि पावसामुळे लाल कांद्याचे लांबलेले आगमन या कैचीत सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव दररोज नवे विक्रम रचत आहेत. सोमवारी कळवण बाजार समितीत प्रथम दर्जाच्या कांद्याचे भाव प्रति क्विंटल सहा हजार रुपयांच्या पुढे गेले. नवीन कांद्याची मुबलक आवक होण्यास अजून महिना लागणार असल्याने हा कालावधी सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरणार आहे.
देशातून प्रथम दर्जाच्या कांद्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने लाल कांद्याचे आगमनही लांबणीवर पडले आहे. त्यामुळे कांद्याचे दर उसळी घेत आहेत. कळवण बाजार समितीत प्रति क्विंटलला कमाल ६०५० ते किमान ५५०० आणि सरासरी ५८०० रुपये असा भाव मिळाला. या बाजारात साडेपाच हजार क्विंटलची आवक झाली. सटाणा बाजार समितीत ५९४५-३६०० आणि सरासरी ५४५५ रुपये असे भाव राहिले. या बाजारात १० हजार क्विंटलची आवक झाली. लासलगाव बाजार समितीतही कांदा भावाने हंगामातील सर्वोच्च भावाची नोंद केली. या ठिकाणी कमाल ५७०० ते किमान ३००० आणि सरासरी ५४५१ रुपये असा भाव होता. दोन दिवसांत येथील भावात सरासरी ६५० रुपयांनी वाढ झाली. यापूर्वी डिसेंबरमध्ये लाल कांद्याला ४२९९ रुपये भाव जाहीर झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी महिनाभर झळ
दरवाढीची ही शृंखला पुढील २० ते २५ दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. दर वर्षी या कालावधीत गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील कांदा बाजारात येत असतो; परंतु यंदा तेथेही पावसामुळे लाल कांद्याचे आगमन लांबणीवर पडले आहे. राज्यातील खान्देश, लोणंद व पुणे या भागांतील कांदाही बाजारात येणे सध्या बंद आहे. नवीन कांद्याची आवक होईपर्यंत भाववाढीची चांगलीच झळ सर्वसामान्यांना सोसावी लागणार असल्याचे दिसत आहे.