महात्मा गांधींच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचे खरे प्रेम गांधीछाप नोटेवर आहे. या नोटांसाठीच काँग्रेसने देश बरबाद केला आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली. सभेत त्यांनी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टिकास्त्र सोडले.
    राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांचा झंझावाती दौरा सुरू आहे. येथील तपोवन मदानात भरदुपारी झालेल्या सभेलाही विराट जनसमुदाय उपस्थित होता. सभेत राज्यातील आघाडी शासनाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे त्यांनी काढले. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्र बरबाद झाला तो सत्ताधाऱ्यांनी लुटल्यामुळे. त्यांनी जनतेच्याही खिशात हात घातला. इतकेच नव्हेतर बालकांचे माध्यान्ह भोजनही लुटले. महाराष्ट्र असा लुटू द्यायचा का? विकासात तो मागे राहू द्यायचा का? याचा फैसला या निवडणुकीत करताना आघाडी शासनाला सत्तेवरून दूर सारले पाहिजे. भारतीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन नावांनी ते राजकारण करीत असले तरी मनाने एकच आहेत. ते राष्ट्रवादी नाहीत तर भ्रष्टाचारवादी आहेत, असा हल्ला त्यांनी चढविला.
    भाजपने महात्मा गांधींना हिरावून घेतल्याची टीका काँग्रेसने चालविली आहे, त्याचा समाचार घेताना मोदी म्हणाले, गांधीजी हे महात्मा असल्याने त्यांना कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण काँग्रेसने मात्र गांधींना सोडले आहे हे नक्की. १९२५ साली कोल्हापुरात गांधींनी चरखा आश्रमाची पायाभरणी केली होती. आज आश्रम कोठेच दिसत नाही. त्याविषयी काँग्रेसने पुढे काहीच केलेले नाही. हा काँग्रेसने गांधीविचारांशी केलेला द्रोह आहे असा आरोप त्यांनी केला.
    नाव बुडत असताना त्यातून पळ काढण्यात शरद पवार चतुर आहेत, अशा शब्दांत मोदींनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळीच नाव बुडणार हे माहीत असल्याने पवारांनी राज्यसभेत निवडून जाणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीतही त्यांची नाव बुडणारच आहे. आपले काम सामान्यांच्या जनहितास प्राधान्य देणारे कसे आहे, त्याचे विवेचन मोदींनी केले. सत्ता येऊन पाच महिने झाले असताना विरोधक मात्र मोठे व्हिजन दाखवा असे म्हणत आहेत. पण मी गरिबी अनुभवलेला माणूस असल्याने छोटय़ांसाठी मोठी कामे करण्यासाठी आलो आहे. हे स्वप्न घेऊन निघालो असल्याने त्यासाठी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.