स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा होता तो धुळीस मिळवण्याचा कार्यक्रम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारने सुरू केला आहे. या विरोधात आता सर्वांनीच एल्गार पुकारण्याची गरज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांनी सातारा येथे व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्यावतीने साताऱ्यातील गांधी मैदानावरील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जनवादीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष कॉम्रेड नसीमा शेख होत्या. यावेळी कॉ अंजलीताई महाबळेश्वरकर, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उदय नारकर कॉ सुधा सुंदरामन, शुभा शमीम, प्राची हातिवलेकर, मरियम ढवळे, किरण माने, माणिक अवघडे आनंदी अवघडे आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बदलण्याचे काम करीत आहेत. आणि हा बदमाशीपणा आपल्याला जनतेपुढे आणायचा आहे. जो एकात्मतेचा विचार घेऊन स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले ते हौतात्म्य आम्ही वाया जाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करून वृंदा करात यांनी स्वातंत्र्य युद्ध सुरू होते तेव्हा मोदीजी यांच्या विचाराचे अनुयायी कुठे होते असा सवाल उपस्थित केला. देशाच्या संविधानावर घाला घालण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वा खालील सरकार करत असल्याचा आरोप करून संविधान बदलण्याचे कारस्थान आम्ही हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला. देश वाचवायचा असेल तर आगामी काळात केंद्रातील मोदी सरकार हटवायला हवे असे आवाहन केले. देशात महागाई वाढली आहे, परंतु पंतप्रधान मोदी व त्यांच्या समर्थकांना त्याची काळजी नाही. तर त्यांना हनुमान चालीसा वाचणेची काळजी आहे. यावेळी कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर, शुभा शमीम, मरियम ढवळे, यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जनवादी च्या जिल्हा चिटणीस आनंदी अवघडे यांनी केले सूत्रसंचालन प्राची हातिवलेकर यांनी केले.‌

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modis plan to destroy unity and brotherhood will be thwarted vrinda karat msr
Show comments