छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : देशातील विविध भाषांनी एकमेकांना समृद्ध केले. मात्र भाषेवरून भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. याबाबत सावध राहीले पाहिले असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील विज्ञान भवन येथे संमेलनाच्या उद्घाटनाला स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, महामंडळाचे सदस्य, प्रकाश पागे, उज्ज्वला मेहेंदळे, संमेलनाचे आयोजक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.

हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप तामिळनाडू सरकार केंद्रावर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान महत्त्वाचे ठरते. विंदा करंदीकरांसारख्या अनेक मराठी साहित्यिकांचे साहित्य इतर भाषांमध्ये गेलेले आहे. भाषांमध्ये कधीही वैर नव्हते, त्यांनी एकमेकांना समृद्ध केले आहे. भाषांच्या मुद्द्यावरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा भाषांचा वारसाच हे भेद मिटवून टाकतात. भाषा समृद्ध करणे आपली जबाबदारी आहे. मराठीसह प्रमुख भाषेमध्ये शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, असे मोदी म्हणाले.

मोदींनी तासाभराच्या भाषणात अनेकदा मराठीतून उपस्थित जनांशी संवाद साधला. ‘देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी जनांना माझा नमस्कार’… ‘ज्ञानबा-तुकारामाच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे..आणि आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे’… अशी अनेक वाक्ये मराठीतून म्हणत मोदींनी संमेलनासाठी दिल्लीत आलेल्या मराठीप्रेमींची मने जिंकली!

मोदींनी भाषणात ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास अशा अनेक संतांच्या अभंग-ओव्यांची पेरणी करत मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याची आपल्यालाही ओळख असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वरांनी म्हटले होते की, मराठी भाषा अमृतापेक्षाही मधुर आहे. त्यामुळे मला मराठी भाषा आवडते. मी मराठीतील नवे शब्द शिकण्याचा प्रयत्न करत असतो, असे मोदी म्हणाले. ‘छावा’ चित्रपटाला लोकांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याचाही उल्लेख मोदींनी केला.

‘काही महिन्यांपूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देश-विदेशात १२ कोटींहून अधिक मराठी भाषिक आहेत. मराठीला अभिजात भाषेला दर्जा मिळण्याची कोट्यवधी मराठीजन कित्येक दशके वाट पाहात होते. हे काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली हेही माझे सौभाग्य आहे, असे मोदींनी सांगितले.

गुलामीच्या शतकांच्या कालखंडामध्ये मराठी भाषा आक्रमकांपासून मुक्तीचे साधन बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारख्या मराठा वीरांमुळे शत्रूंची पळता भुई थोडी झाली होती. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. त्यांचे मराठी साहित्याच्या विकासामध्ये मोठे योगदान होते. टिळकांनी गीतारहस्य मराठीत लिहिले होते. केसरी, मराठासारखे वृत्तपत्र, गोविंदाग्रजांची ओजस्वी कविता, राम गणेश गडकरींची नाटके यांच्या या मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेमाला खतपणी घातले. त्यातून देशाला स्वातंत्र्याच्या आंदोलनाला उर्जा दिली, अशा शब्दांत मराठीच्या योगदानाचे मोदींनी कौतुक केले.

मराठीमध्ये शौर्य आणि विरता, सौंदर्य आणि संवेदनशीलता, समानता आणि समग्रपणा, अध्यात्म आणि आधुनिकता, भक्ती आणि शक्ती तसेच युक्तीही आहे, असे गौरवोद्गार मोदींनी काढले. मराठी भाषेने शोषित, वंचित समाजाला सामाजिक मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचेही अद्भुत काम केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान समाजसुधारकांनी मराठी भाषेमध्ये नव्या विचारांची प्रेरणा दिली. मराठीने समृद्ध दलित साहित्यही देशाला दिले आहे, असा मुद्दा मोदींनी अधोरेखित केला.

संघामुळे मराठी परंपरेशी जोडण्याचे सौभाग्य

मराठी भाषिक महापुरुषाने १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज पेरले होते, आज संघ वटवृक्षाच्या रुपात शताब्दी वर्ष साजरा करत आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत भारताची महान परंपरा व संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संस्कारयज्ञ संघ शंभर वर्षे करत आला आहे. माझ्यासारख्या लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळेच मराठी भाषा व मराठी परंपरेशी जोडण्याचे सौभाग्य मिळाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.