शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझ्याकडून शुभेच्छा. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी ते मेहनतीने काम करतील हा मला विश्वास आहे” असे मोदी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2019
काल रात्री सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीकडून पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले होते. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळयाला भाजपाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पत्नीसह शपथविधी सोहळयाला उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभराने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. त्याआधी राज्याच्या राजकारणात प्रचंड सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण अवघ्या तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले. त्यानंतर दोन दिवसात राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले आहे.