धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिव शहरात पहिल्यांदा सभा होत आहे. या ऐतिहासिक सभेसाठी २५ एकर क्षेत्रावर नियोजन केले जात आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी लाखाहून अधिक मतदार, कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रविवारी प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस लोकसभा निरीक्षक खासदार अजित गोपछडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, अॅड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले की, मागील १० वर्षात महायुती सरकारने कसलाही भेदभाव न करता देशाला विकासाच्या प्रवाहात आणून विकास केला आहे. येत्या काळातही देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असतील, याची सर्व जनतेला खात्री आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंगळवार, ३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिवला जनतेशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत.
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या २५ एकर क्षेत्रावर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय पातळीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यामुळे वेगाने हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधानांचा दौरा हा प्रशासनासाठीही प्रोटोकॉलचा भाग आहे. त्यासाठी सहा ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या धाराशिवमध्ये सभा होत आहे.
हेही वाचा…नाशिकच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “ते विधान मी…”
या सभेसाठी पंतप्रधानांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपाचे जिल्हाप्रमुख संताजी चालुक्य, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे, दत्ता कुलकर्णी आदींची उपस्थिती असणार आहे. या सभेसाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.