विकासकामांचे भूमिपूजन, जाहीर सभा
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ९ जानेवारी रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याचे नियोजन आखले जात आहे. यानिमित्ताने त्यांची जाहीर सभा घेण्याचाही घाट घातला जात असून त्यासाठी मैदान निश्चित केले जात आहे. प्रशासनाच्या स्तरावरही बैठका होत आहेत. तर मोदी यांचा हा दौरा स्थानिक भाजपसाठी नवऊर्जा ठरणारा असल्यामुळे पक्षांतर्गत घडामोडीही वाढल्या आहेत.
या दौऱ्यात सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, तसेच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल ३० हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आखले जात आहे.
या पाश्र्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीस पालकमंत्री विजय देशमुख यांचीही उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर भेटीत त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यासाठी विविध चार मैदानांचा विचार करण्यात आला. यात जुळे सोलापुरातील मैदान, इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम, विजापूर रस्त्यावरील शिवाजी अध्यापक विद्यालयाचे मैदान व सिध्देश्वर साखर कारखान्याजवळील मैदान या चारही मैदानांची पाहणी करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा अद्यापि अधिकृतपणे निश्चित झाला नसल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.