नागपूरमधील प्रा. डॉ. मोरेश्वर उर्फ महेश महादेव वानखेडे यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी आणि मुलीनेच प्रा. वानखेडे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रा. वानखेडे यांची पत्नी अनिता, मुलगी सायली आणि अन्य चार आरोपींना अटक केली आहे.
नागपूरमध्ये राहणारे डॉ. मोरेश्वर वानखेडे हे चंद्रपूरमधील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य होते. शुक्रवारी सकाळी प्रा. वानखेडे यांची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ते दुचाकीने अजनी रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी निघाले. छत्रपती चौकातून अजनी, नीरी मार्गाने जात असताना नीरीच्या प्रवेशद्वारावर एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. ते गाडीसह २० फूट फरफटत गेले व एका झाडावर आदळले. त्यानंतर त्यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरून खून केला होता.
प्राचार्य वानखेडे यांच्या हत्येने खळबळ माजली होती. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. वानखेडे यांची पत्नी अनिता, मुलगी सायली यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली. सायलीने तिच्या प्रियकरामार्फत ही सुपारी दिल्याचे उघड झाले. अनिता, सायली आणि तिच्या प्रियकराच्या कॉल डिटेल्समुळे हा सर्व प्रकार उघड झाला. हत्येसाठी गुंडांना ४ लाख रुपये देण्यात आले होते.
अनिता ही टेकडी गणेश मंदिर परिसरातील ख्यातनाम शाळेमध्ये शिक्षिका होती. मुलीचे शिक्षण बी.एस्सी. पर्यंत झाले असून चार वर्षांपूर्वी तिने तेलंगखेडी परिसरातील पवन यादव या मुलाशी प्रेमविवाह केला. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत मतभेद झाल्याने ती वर्षभरापासून माहेरीच राहत होती. माहेरी आल्यावर तिचे एका तरुणाशी सूत जुळले होते. यावरुन तिचा वडिलांशी वाद व्हायचा. तर अनिता आणि डॉ. मोरेश्वर यांच्यातही खटके उडायचे. अनैतिक संबंधना अडथळा ठरत असल्यानेच प्रा. वानखेडे यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.