नवी मुंबईतील वाशी इथे झालेल्या टॅलेटीका आयोजित स्पर्धेत बीडच्या भूमिका सावंतने मिस इंडिया ग्लोबलचा पुरस्कार पटकावला आहे. मूळची बीड येथील असलेल्या भूमिकाचे वडील सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कॉन्स्टेबल आहेत. वडिलांच्या नोकरीमुळे तिचं सध्याचे वास्तव्य हे कल्याण येथे आहे. आता बीड मध्ये आल्यानंतर तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वयाच्या अठराव्या वर्षी तिने हा बहुमान मिळवला. एकीकडे अभ्यास, जिम, ग्रुमिंग, डाएटीग सेशनवर लक्ष केंद्रित करतानाच भूमिकाने या स्पर्धेला सामोरी जाण्याची तयारी केली. भूमिकाने वाशी येथे रंगलेल्या स्पर्धेत मिस महाराष्ट्र म्हणून सहभाग घेतला होता. इतर २४ स्पर्धकामधून १२ तरुण १२ तरुणीतून तिची मिस इंडिया ग्लोबल पुरस्कारासाठी निवड केली गेली.

या पुरस्काराच्या अंतर्गत भूमिकाचा “मिस इको टुरिझम नायजेरिया” या स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. तिच्या या यशानंतर तिच्या आई-वडिलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दरम्यान यावेळी खाकीतली सौंदर्यवती म्हणून ओळख असलेल्या प्रतिभा सांगळे यांनी भूमिकाचे विशेष अभिनंदन केले. प्रतिभा सांगळे या बीड पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी मिस महाराष्ट्राचा पुरस्कार पटकावला होता. या पूर्वी ग्रामीण भागातील महिलेची सीमा केवळ चूल आणि मूल पर्यंत मर्यादित होती. परंतु आता ग्रामीण भागातून पुढे येत असलेले टॅलेंट पाहता त्या देखील मागे नाहीत असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

मला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधत्व करायचंय – भूमिका सावंत

“लहानपणापासूनच मला नृत्य कला आणि मॉडेलिंगची फार हौस होती. पण जसं की सर्वांना माहीतच आहे की पोलिसांचं जीवन केवढं कष्टाचं असतं. पोलीस कर्मचारी कामाच्या व्यापामुळे आपल्या मुलांकडे फारसं लक्ष देऊ शकत नाहीत. पण हे सगळं सांभाळून देखील माझ्या आई-वडिलांनी मला खूप पाठबळ दिलं आणि त्यामुळेच मी एवढी पुढे आहे. याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आता माझं एकच ध्येय आहे, ते म्हणजे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधत्व करायचं आहे आणि हे मी नक्कीच करून दाखवेन.” अशा शब्दांमध्ये भूमिकाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.