जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ३ वर्षे उच्च न्यायालयात लढा दिल्यावर आज निर्दोष सुटणारे ७५ वर्षीय रामकिसन गोवर्धन प्रसाद धुर्वे यांना भंडारा जिल्हा कारागृहातील घालविलेली ३ वर्षे आनंदाची आणि सौभाग्याची वाटली.
ते म्हणाले, येथील कारागृह मला शाळेसारखी वाटली. या कारागृहाने मला उभारी दिली. म्हातारपणी येथे पुष्कळ काही शिकलो. कारण, शिकण्याचे वातावरण येथे तयार झाले आहे. मी रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त झालो. दोन मुले उत्तरप्रदेशात अधिकारी आहेत. नातू इंजिनिअर आहे; परंतु त्यांच्याकडे जाण्याची इच्छा नाही. पेन्शनचे ९ हजार रुपयेमला व कुटुंबाला पुरतात. आता उर्वरित आयुष्यात असहाय व गरिबांना मदत करायची आहे. सेवाधर्म पार पाडायचा आहे. आपल्या हिंदीसदृश्य मातृभाषेत बोलताना, ते म्हणाले, ‘भरे को क्या भरे, खाली है उसे भरे’.
सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या रामकिसन धुर्वे यांना व्यावहारिक ज्ञान चांगलेच आहे. आपण जातीने गोंड असल्याने नक्षलवादी क्षेत्रात आपल्या जातभाईंना, दृष्टप्रवृत्तीपासून रोखण्याचे प्रयत्न करू. गोंदिया जिल्ह्य़ातील सालेकसाजवळ, तसेच दरेकसाजवळील धन्येगाव येथे दिवंगत शिक्षक असलेल्या वडिलांच्या नावाने गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. हे सर्व सांगताना ते कारागृहाच्या उपकाराखाली आपण खूप दबलो आहोत, अशी जाणीव करून देत होते.
या कारागृहात १३ जून २०१० ला आल्यावर कारागृह अधीक्षकांच्या प्रयत्नामुळे हायकोर्टात शिक्षेविरुद्ध लढण्याकरिता अॅड. सारंग कोतवाल मिळाले. खून केला नसतानाही आपण फसविले गेलो होतो. त्यामुळे खुनाचा डाग धुऊन निघेल, याची खात्री होती. वकिलांनी आपले कसब पणाला लावले व आपली निर्दोष सुटका झाली. या दरम्यान कारागृहात ह्रदयविकाराचा मोठा आघात झाला. पूर्ण बरा होईपर्यंत कारागृहातील अधिकाऱ्यांनी मोठय़ा आपुलकीने सेवा केली. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळली. मला कोर्टातून जमानत मिळत होती; परंतु ती मिळविली नाही. माझी पेंशन दर महिन्याला पत्नी व मुलांना नियमित पोहोचवून देण्याची व्यवस्था या कारागृहाने चोख बजावली, असे ते म्हणाले.
या कारागृहात बहुतेक कैदी नेहमी चांगल्या विचारात व विविध कामात गुंतले राहतील, त्यांना वेळोवेळी चांगले विचार मिळतील, चांगल्या कामाची शाबासकी मिळेल, आपल्या कलागुणांना प्रकट करण्याची संधी मिळेल, अशी व्यवस्था कारागृह अधीक्षक अशोक जाधव यांनी केलेली आहे. चुकल्यावर किंवा शिस्त मोडल्यावर शिक्षा होईल, असा धाकही आहे. येथील बंदी कविता व नाटक रचतात. सांस्कृतिक कार्यक्रम करतात, परीक्षेला बसतात, सुंदर बगिचा फुलवितात, इतकेच नाही, तर टाकावूतून ते टिकावू काष्ठशिल्प तयार करतात. कारागृहात कुठेही घाण किंवा कचरा आढळत नाही, हे माझे निरीक्षण आहे. मी ७४ व्या वर्षांत गांधी विचार परीक्षेला बसलो. प्रमाणपत्र मिळाले. दोन-अडीचशे बंद्यांसमोर कारागृह अधीक्षकांनी बोलायला लावले. सवय नसतानाही गांधीजींवर पहिल्यांदा बोललो. गांधीजींचे सत्याचे प्रयोग (आत्मकथा) हे बक्षीस मिळालेले पुस्तक एकदा नाही तर चार-पाचदा वाचले तेव्हापासून इतरांकरिता काहीतरी करावे, असे वाटते. जो चुका सुधारतो तोच मोठा होतो, असे हे पुस्तक वाचल्यावर मला जाणवले. म. गांधी किंवा इंदिरा गांधी त्यांचा खून होऊनही मिटले नाहीत. खऱ्याला मारून मिटवता येत नाही, असेही ते बोलून गेले. कारागृहातून बाहेर जाण्याची वेळ होत होती. रामकिसन धुर्वे यांना खूप बोलायचे होते. मुलाखत संपवितांना त्यांना विचारले, तुम्ही या कारागृहाला बंद्यांची पाठशाळा म्हटले, तर या शाळेत तुम्ही काय शिकले? हे थोडक्यात सांगा. ते म्हणाले, डोके भडकलेल्या लोकांना, थंड डोक्यानेच बरे करता येते. प्रार्थनेमुळे मनाला शांती मिळते. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नये. अपेक्षा ठेवली व पूर्ण झाली नाही तर दु:ख होते, असे बोलता बोलताच मुखोद्गत असलेल्या प्रार्थनेच्या चार ओळी त्यांनी गाऊन दाखविल्या. अखेर ते म्हणाले, या कारागृहातील देवमाणसांना सोडून जाताना दु:ख होत आहे. माझ्या चुकांमुळे, माझी मुले, बनारस, कानपूरवरून, मला भेटायला एकदाही आली नसतील, परंतु माझ्या सुखदु:खात सामील होऊन मुलाचे प्रेम देणारा अधिकारी सख्या मुलाचे प्रेम देता झाला. कारागृह अधीक्षक अशोक जाधवांबद्दल ते बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा