भाजीपाल्यांसोबतच सुगंधी वनस्पतींचा दरवळही
राज्यातील विविध कारागृहांमधील शेतीतून गेल्या वर्षभरात सुमारे ३ कोटी ६४ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले असून २ कोटी ४ लाख रुपयांचा निव्वळ फायदा झाला आहे. सर्वाधिक शेती उत्पादन घेऊन पैठण खुल्या कारागृहाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तेथे आता भाजीपाल्यासोबतच सुगंधी वनस्पतींचा दरवळ आता कारागृहांमध्ये पसरला आहे.
राज्यात एकूण ४३ कारागृहे आहेत. त्यात ९ मध्यवर्ती कारागृहे, २५ जिल्हा, पाच खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहे. या कारागृहांची क्षमता २२ हजार कैद्यांची असली, तरी नेहमी या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असतात. कच्चे कैदी आणि शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी सुतारकाम, विणकाम, कागद कारखाना, रसायन उद्योग, लोहारकाम, चर्मकला, असे उद्योग आहेत. यासोबतच कारागृहातील कैदी शेतीतही कामे करतात. राज्यातील शेतीक्षेत्र असलेल्या २९ कारागृहांमध्ये एकूण ८१९ हेक्टर जमीन आहे. यापैकी ३२७ हेक्टरवर शेती केली जाते. यापैकी १८६ हेक्टर बागायती आणि १४० हेक्टर कोरडवाहू आहे. १८० हेक्टरमध्ये वनीकरण करण्यात आले आहे. ८० हेक्टर क्षेत्र पडीत आहे. कारागृहातील कैद्यांना दैनंदिन आहारासाठी लागणारा भाजीपाला, अन्नधान्य हे या शेतीतून पिकवले जाते. यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, भात, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, टिश्यू केळी, अशी पिके घेतली जातात. काही कारागृहांमध्ये दूध आणि मासे यांचेही उत्पादन घेतले जाते. विसापूर, कोल्हापूर आणि पैठणच्या कारागृह परिसरात ऊस शेतीही केली जात आहे.
कारागृह विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५-१६ या वर्षांत कारागृहांमधील शेतीत ८२९ पुरुष आणि ४० महिला कैद्यांना दररोत काम मिळाले आहे. येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातील शेतीत २ एकर क्षेत्रावर उतीसंवर्धित जी-९ या वाणाची खोडवा केळी लागवड करण्यात आली. याशिवाय, नाशिक रोड, पैठण आणि येरवडा खुल्या कारागृहातील शेतीक्षेत्रात महाबीजमार्फत ज्वारी आणि गहू बिजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात आला. गेल्या वर्षभरात कारागृहांमधील शेतीवर एकूण १ कोटी ६० लाख रुपयाचा खर्च, तर ३ कोटी ६४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि त्यातून २ कोटी ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती आला. शेती उत्पन्नाच्या बाबतीत पैठण कारागृहाला प्रथम, विसापूर कारागृहाला द्वितीय, तर नाशिक रोड खुल्या कारागृहाला तृतीय क्रमांक मिळाला. कैद्यांना रोजगाराद्वारे कमाई होण्यासाठी, तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी अनुभव मिळावा, या हेतूने कारागृह विभागाने फळभाजी, पालेभाजी, अन्नधान्य उत्पादनाव्यतिरिक्त कारागृहांमध्ये रोपवाटिका विकसित करण्यात आल्या आहेत. काही कारागृहांमध्ये मत्स्यपालन, मशरूम उत्पादन घेण्यात येत आहे. याशिवाय, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत येरवडा कारागृहात अळंबी उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वर्षांला १२ ते १५ टन आहे.
राज्यातील १० कारागृहांमध्ये राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या अनुदानातून सुगंधी वनस्पतीच्या लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. चंदन वृक्षांची लागवडही या चार भिंतींच्या आत उपलब्ध जागेत करण्यात आली आहे.
राज्यातील शेतीक्षेत्र असलेल्या २९ कारागृहांमध्ये एकूण ८१९ हेक्टर जमीन आहे. यापैकी ३२७ हेक्टरवर शेती केली जाते. यापैकी १८६ हेक्टर बागायती आणि १४० हेक्टर कोरडवाहू आहे. १८० हेक्टरमध्ये वनीकरण करण्यात आले आहे.