सोलापूर : सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात सोलापूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना जिल्हा कारागृहालाही त्याची झळ बसत आहे. त्यासाठी कारागृह प्रशासनाने सोलापूर महापालिकेकडे पाणीपुरवठ्यासाठी दोन इंची जलवाहिनीची जोडणी देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविली खरी; परंतु नवीन नळजोडणीसाठी कारागृहाबाहेर खोदकाम करण्यासाठी कारागृह प्रशासनाने कच्च्या कैद्यांना जुंपण्याची जोखीम पत्करल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
पाच्छा पेठेत ब्रिटिशकालीन अ दर्जाचे जिल्हा कारागृह अस्तित्वात आहे. या कारागृहात ३५० पेक्षा जास्त कच्चे कैदी ठेवले जातात. परंतु सध्याच्या उन्हाळ्यात या कारागृहातही पाणीटंचाईची मोठी झळ बसत आहे. एक इंची नळावाटे अपुरे आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याने कारागृह प्रशासनाने सोलापूर महानगरपालिकेकडे नवीन दोन इंची जलवाहिनी जोडून देण्याची मागणी केली होती.
गेल्या जानेवारीपासून पत्रव्यवहार झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कोटेशनप्रमाणे नवीन दोन इंची जलवाहिनी मंजूर केली. मात्र त्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची नाही. त्यासाठी कारागृह प्रशासनाने मजुरांकडून खोदकाम करून घेणे अपेक्षित होते. महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी हे स्पष्ट केले.
तथापि, जलवाहिनी टाकण्यासाठी खासगी मजुरांकडून कारागृहाबाहेर रस्त्यावर खोदकाम करून घेण्याऐवजी चार कच्च्या कैद्यांना जुंपण्यात आले. कारागृहाबाहेर खुल्या वर्दळीच्या सार्वजनिक रस्त्यावर कच्चे कैदी खोदकाम करताना पाहून नागरिकांना आश्चर्य वाटले. कारण असे काम कारागृहाबाहेर कैद्यांकडून करून घेणे जोखमीचे होते. त्याबाबत विचारणा करताच कारागृह प्रशासनाने त्या चारही कैद्यांना कारागृहात परत नेले.
यासंदर्भात कारागृह अधीक्षक प्रदीप बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहात होणारा पाणीपुरवठा खूप अपुरा आहे. त्याची झळ सध्याच्या उन्हाळ्यात कच्च्या कैद्यांना बसत आहे. म्हणून कारागृह प्रशासनाने नवीन दोन इंची जलवाहिनी कारागृहात जोडून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे कायदेशीर प्रक्रिया राबविली. परंतु जलवाहिनी जोडण्यासाठी आवश्यक असलेले खोदकाम करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची नाही तर संबंधित मिळकतदाराने मजूर उपलब्ध करून खोदकाम करून घ्यायचे असते. मात्र कारागृह प्रशासनाने या कामासाठी बाहेरून मजूर उपलब्ध करून न घेता कारागृहातीलच कच्च्या कैद्यांकरवी खोदकाम करून घेतल्याचे दिसून आले.
कारागृह प्रशासनाने याबाबत विचारणा करूनही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे कारागृहाबाहेर कैद्यांना नेऊन खोदकाम करून घेताना एखादा कैदी कारागृह जवानांची नजर चुकवून पळून गेला तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.