पृथ्वीराज चव्हाणांची अजित पवार यांच्यावर टीका
सातारची स्वाभिमानी जनता आता ‘बारामती’चा आदेश मानत नाही, हे काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या विजयावरून स्पष्ट झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आघाडी साधली असती तर दोघांच्याही जागा वाढल्या असत्या पण राष्ट्रवादीने हटवादी भूमिका घेतल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार मोहनराव कदम यांनी विजयानंतर कराड येथे येऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली, या वेळी ते बोलत होते. कदम यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून सध्या चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. पुरेशी मतदारसंख्या नसतानाही चव्हाण यांनी सुरुवातीपासून केलेल्या योग्य नियोजनामुळे कदम यांचा विजय साकार झाला आहे.
चव्हाण म्हणाले की, या निवडणूक निकालाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाला पुन्हा एकदा ‘लक्ष्य’ केले आहे. राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या हट्टामुळेच त्या पक्षाची आजची ही अवस्था झाली आहे. त्यांच्या उमेदवाराला पराभवाचा फटकाही त्यामुळेच बसला आहे. खरेतर मोहनराव कदम यांची उमेदवारी नक्की करतानाच आम्ही त्या पक्षातील नाराजीचा आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज घेतला होता. काँग्रेसने एका निष्ठावंत कार्यकर्त्यांला न्याय देण्याचे काम या निमित्ताने केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने एका ठेकेदाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली. आज त्यांचा उमेदवारही पराभूत आणि त्यांच्या नेत्यांची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली आहे. यातून त्यांनी योग्य तो धडा घ्यावा.
राज्यातील आजच्या निकालात काँग्रेसला दोन जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आली आहे. दोन्ही काँग्रेसने समन्वयातून आघाडी साधली असती तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्याही जागा वाढल्या असत्या. पण राष्ट्रवादीने हटवादी भूमिका घेतल्याने त्यांचे नुकसान झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.