श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर चव्हाण यांना धमकीचे फोन आणि ई-मेल आल्याची बाब समोर आली. “गुरुजींना अटक करण्याची भाषा करता, तुम्हाला जगायचं आहे का?” असा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण यांना आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.
दरम्यान, संभाजी भिडे प्रकरणावरून आज पुन्हा एकदा विधानसभेतलं वातावरण तापलं. विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत सत्ताधारी पक्ष संभाजी भिडेंना पाठिशी का घालत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देत संभाजी भिडेंप्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली आहे? याची माहिती दिली.
दुसऱ्या बाजूला, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत संभाजी भिडेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा उल्लेख केला. तसेच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे यांच्या अमरावतीतल्या वक्तव्याचा उल्लेख केल्यानंतर मला धमकीचा फोन आणि ई-मेल आला आहे. यातील आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून जामिनावर सोडून दिलं आहे. याप्रकरणी आमदार यशोमती ठाकूर, आमदार जितेंद्र आव्हाड आणि मला धमकीचे फोन आले आहेत. या धमकी प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे? त्यांना कोण प्रवृत्त करतंय? असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा >> नितीन देसाईंनी आत्महत्या का केली? सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हा (संभाजी भिडे) एक फ्रॉड माणूस आहे. त्याची डिग्री काय आहे? त्याने शिक्षण कुठे घेतलंय? हा कुठे प्राध्यापक होता? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हा माणूस सोनं गोळा करतोय. आपल्या कायद्याप्रणाणे कुठल्याही संस्थेने वर्गणी गोळा करायची असेल तर त्याची संस्था जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणीकृत असावी लागते. वर्गणीतून गोळा झालेल्या पैशाचा त्याला हिशेब द्यावा लागतो. हा माणूस (संभाजी भिडे) कितीतरी टनानं सोनं गोळं करतोय. प्रत्येकाकडून एक-एक ग्रॅम सोन घेतोय. युवकांची दिशाभूल करतोय.