कराड : काँग्रेसने देशात लोकशाही आणली, पण विधानसभेतील निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. लोकसभेनंतर चार महिन्यांत विधानसभेच्या निकालाचे उलटे चित्र दिसले. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपणही एकसंधपणे काम करून राजकीय चित्र बदलूयात, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केले.
काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा मेळाव्यात निषेध करण्यात आला.
हेही वाचा >>>गुन्हेगारीविरोधात सर्वपक्षीय आक्रोश; धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीची बीडमध्ये मागणी
चव्हाण म्हणाले, ‘लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल आपण स्वीकारला. राज्यातील वातावरण हे संशयाचे असल्याने निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती इतकी बदलेल, असे वाटत नाही. पारदर्शक, मुक्त वातावरणात निवडणुका होत नाहीत. मतदान यंत्र (ईव्हीएम) प्रक्रियेबाबत प्रत्येकाला शंका आहे. काँग्रेसने पुढील निवडणुका मतदान प्रक्रियेने झाली पाहिजे, याकरिता देशव्यापी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांनी विचार दिला; तो तात्पुरता विधानसभा निवडणुकीनंतर लुप्त झाला. पुढील काळ कार्यकर्त्यांच्या कसोटीचा आहे. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मी तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. चार महिन्यांत अनेक घडामोडी होतील. त्यावर मात करून आपण स्थानिक निवडणुकांना सामोरे गेल्यास निश्चित यश मिळेल,’ असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आम्हाला मान्य असून, हेच हिंदुत्व टिकवण्याची गरज आहे. महात्मा गांधींनाही हिंदुत्व मान्य होते. अखेरचा श्वास घेताना ते ‘हे राम’ म्हणाले होते. या निवडणुकीचे सिंहावलोकन करून पुढे जाणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना, मोफत वीज, धार्मिक तेढ यामुळे महायुतीला यश मिळाले. ईव्हीएमबाबत सर्वत्र शंकेचे वातावरण आहे. या परिस्थितीत संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. सामान्य माणसापर्यंत पोचले पाहिजे. नेता आणि कार्यकर्ता बरोबर चालला, तर संघटनेला उभारी देऊ शकतो.’