महाराष्ट्रातील घोडेबाजावरून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी मान्यता दिली नसती, तर महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नसता, असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. याला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं, “आयाराम-गयाराम संस्कृती थांबवण्यासाठी राजीव गांधींनी पक्षांतरबंदी कायदा आणला. पण, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना २००३ साली कायद्यात सुधारणा आणि बदल झाले. त्यामुळे तो कायदा कुचकामी ठरला. या कायद्याने कुठलीही पक्षांतरबंदी थांबत नाही. घोडेबाजाराला उत आला असून, याचा प्रशासन, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.”
“घोडेबाजार, खरेदी विक्रीला उघडपणे भाजपाकडून प्रोत्साहन”
“महाराष्ट्रातील जनतेनं अशाप्रकारे वागणाऱ्या राजकीय नेत्यांना जागा दाखवली पाहिजे. दुसरी जबाबदारी पंतप्रधान मोदींची आहे. मोदींनी मान्यता दिली नसती, तर महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नसता. सत्ता मिळवण्याच्या सूत्रावर देश चालला आहे. घोडेबाजार, खरेदी विक्रीला उघडपणे भाजपाकडून प्रोत्साहन मिळत आहे,” असा आरोपही पृथ्वीराज चव्हाणांनी लावला.
“महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नाही, ही तत्वांची लढाई”
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर मंत्री दीपक केसरकरांनी आक्षेप घेतला आहे. “पृथ्वीराज चव्हाणांनी चुकीचं विधान केलं आहे. अनेक लोक काँग्रेसमध्ये गेल्यावर घोडेबाजार दिसला नाही. मला पृथ्वीराज चव्हाणांबद्दल आदर आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी असं विधान करू नये. काँग्रेसने कित्येक राज्यांची सरकारे बरखास्त केली होती, याची माहिती सगळ्यांसमोर आहे. महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नाही, ही तत्वांची लढाई आहे,” असं दीपक केसरकरांनी सांगितलं.