राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. न्यू इंडिया एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अजित पवारांसह ४० आमदार पक्षातून बाहेर पडून सरकारमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. परंतु, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी ‘ऑपरेशन लोटस’ची शक्यता वर्तवली आहे. भाजपाकडून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांनी कर्नाटकचा उल्लेख करून पक्षांतर बंदी कायद्याविरोधात कारवाई होऊ नये म्हणून फूटीर गटाला भाजपाला विलिन व्हावं लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा >> अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक?
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
“चाळीस आमदारांचा गट बाहेर पडायला तयार आहे हे गृहित धरलं तर ही मंडळी भाजपामध्ये भाजपात तयार जायला आहेत. भाजपात विलिन होणार की आणखी कृप्ती काढणार. हा गट दुसऱ्या गटात विलिन होत नाहीत तोवर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याची तलवार राहणार. त्यापेक्षा मला ऑपरेशन लोटसची जास्त शक्यता वाटते. ऑपरेशन लोटस म्हणजे काय. काही आमदारांनी राजीनामा द्यायचा. कोणीही राजीनामा देऊ शकतो. सभागृहातील सदस्य संख्या कमी होते. समीकरण बदलू शकतात. जे राजीनामा देऊन बाहेर पडतील, त्यांना मंत्री होता येत नाही. पक्षांतर बंदी कायद्यातून गेलेल्यांना मंत्री होता येत नाही. कर्नाटकात जो प्रयोग केला जास्त शक्यता आहे. हे कोण करू शकतं, ज्यांना राजीनामा दिल्यावर निवडून येण्याची खात्री असते. पण तो ४० एवढा आकडा होईल का असं मला वाटत नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
हेही वाचा >> अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देताना म्हणाले, “ही चर्चा…!”
मोदी सामावून घेतील का?
“भाजपाने या फुटीर गटाला विलिन करून घेतलं तर ते होऊ शकतं. पण ते मला शक्यता कमी वाटते. एवढ्या मोठ्या संख्येने भाजपात विलिन होणं कठीण आहे. मोदींवर आरोपांचे सत्र सुरू आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना आपल्या पक्षात सामावून घ्यायचं, म्हणजे त्यांनी पुढच्या निवडणुका लढायच्या की नाहीत? असं चाललं आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आठ-नऊ आमदार भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. असं वातावरण देशात आहे. अदाणी प्रकरणावर कोणी उत्तर द्यायला तयार नाही. मोदींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे, मोदी इतर पक्षांच्या आमदारांना आपल्या पक्षात सामावून घेतील आणि हे आमदार बुडत्या बोटीत जातील असं मला वाटत नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.