कराड : ॲडॉल्फ हिटलरच्या ‘एक राष्ट्र- एक सरकार, एक नेता’ धोरणानुसार नरेंद्र मोदी हुकुमशाहीकडे चाललेत. त्यासाठी रशिया, चीन, उत्तर कोरियाच्या नेतृत्वाप्रमाणे त्यांचे व्यक्तिस्तोम सुरु आहे. परंतु, केंद्रात निश्चितपणे सत्तांतराचे वातावरण असल्याने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, मोदी गोंधळलेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपला सत्ताच मिळणार नाही
चव्हाण म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, भरमसाठ करवाढ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडील दुर्लक्ष आणि अत्याचाराच्या मुद्द्यांसह संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. त्यात शेतकरी, कष्टकरी, युवक, महिलांसह सर्वच घटक मोदींना माफ करणार नाहीत. त्यामुळे भाजपकडील पूर्वीच्या ३१ टक्के मतातही घट होईल. संसदेतील विरोधी ३८ पक्ष त्यांच्या समोर असल्याने कोणत्याही राज्यात भाजपला पूर्वीप्रमाणे यश मिळणार नाही. ‘चारशे’पार सोडा, गतखेपेच्या ३०३ पेक्षाही खूपच कमी जागा मिळून भाजपला मित्रपक्षांच्या सहकार्यानेही सत्ता मिळणार नाही. केंद्रात निश्चितपणे सत्तांतर होईल, त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असेल, विरोधी पक्षांना अनपेक्षित घवघवीत यश मिळेल असा दावा चव्हाण यांनी केला. कर्नाटकातील प्रज्वल रेवण्णा यांचे लैंगिक शोषणप्रकरण आणि निवडणूक रोख्यांवरून चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले.
हेही वाचा – सोलापूरचा पारा उच्चांकी ४४.४ अंशांवर, शिक्षकाचा उष्माघाताने मृत्यू
जनता ग्रासली
डॉ. मनमोहन सिंग यांच्या केंद्र सरकारमधील देशाचा आर्थिक विकासदर मोदीकाळात घसरलेला आहे. पूर्वीचा विकासदर कायम असता तर जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या नव्हेतर तिसऱ्या स्थानावर असती. पण, केंद्र सरकारकडे आज पगाराला, खर्चालाही पैसे नाहीत. महागाई, भ्रष्टाचारामुळे जनता ग्रासल्याची टीका चव्हाण यांनी केली.
राज्यातील दोन पक्ष संपतील
राज्यात ठाकरे सरकार राहिले असते तर लोकसभेला ‘महायुती’ची एकही जागा निवडून आली नसती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडले. पण, लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणे बदलतील. राज्यातील दोन पक्ष संपतील किंवा इतर पक्षांमध्ये विलीन होतील असे भाकीत करीत चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रकाश आंबेडकरांचा समाचार
डॉ. प्रकाश आंबेडकरांनी साताऱ्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर असल्याचे खळबळजनक विधान केले असल्यासंदर्भात चव्हाण म्हणाले, कोणाचेही नाव न घेता आंबेडकरांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. त्यांचा रोख माझ्याकडे असेल, तर माझी, माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांना माहीत नसावी. मोदी ‘वंचित’च्या माध्यमातून विरोधी मतांचे विभाजन करीत आहेत. ‘वंचित’ची साथ ‘एमआयएम’नेही सोडली असताना, ‘संविधान बचाव’च्या लढ्यात प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत नसल्याने आंबेडकरी जनताही त्यांना थारा देणार नसल्याची टीका चव्हाण यांनी केली.