नितीन गडकरी यांना भ्रष्टाचारी म्हणून, भाजपने अध्यक्षपदावरून दूर केले होते. पण, आज त्यांची बुध्दीही भ्रष्ट झाली असून, ती तपासली पाहिजे. गडकरींइतका खोटारडा माणूस आपण पाहिला नसल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. केंद्रातील वाजपेयी सरकारच्या काळात पृथ्वीराज यांना भाजपात यायचे होते आणि त्यासाठी त्यांनी त्या वेळी आपल्याला फोन केला होता, असा खळबळजनक दावा गडकरी यांनी सोमवारी दुपारी कराड येथे केला होता. यावर सायंकाळी पार पडलेल्या काँग्रसच्या सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी गडकरींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
कराडच्या विठ्ठल चौकात पार पडलेल्या या भव्य सभेला काँग्रसचे प्रवक्ते भाई जगताप, आमदार आनंदराव पाटील, कॉम्रेड बादशाह अल्ली मुल्ला, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, अरूण जाधव, सुभाषराव जोशी, मदनराव मोहिते, बाबासो पटेल यांची उपस्थिती होती.
गडकरी या भ्रष्ट माणसाची बुध्दीही भ्रष्ट झाल्याचे आज सिध्द झाले. आपण केंद्रीयमंत्री, काँग्रेसचा महासचिव, अनेक राज्यांचे प्रभारी होतो. अन् मी या माणसाला फोन करेन का, असा संतप्त सवाल चव्हाण यांनी केला. त्या वेळी माझा त्यांचा परिचयही नसताना गडकरींचे वक्तव्य आश्चर्यकारक म्हणावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सन १९९५ ते ९९ महाराष्ट्रावर हप्ते गोळा करणाऱ्यांचे राज्य होते. गुंडगिरी वाढली होती. टोळीयुध्दं भडकली होती. आज महाराष्ट्र सर्वच क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर असून, त्यांना आकडे वाचता येत नाहीत का? विरोधकांकडून गुजरातचे गोडवे गाताना, महाराष्ट्राबाबत पूर्णत: चुकीचे वक्तव्य होत असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रच देशात नंबर एकचे राज्य असून, यासंदर्भात आपण लोकसभेच्या निवडणुकीवेळीही समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले होते. तेच आव्हान आजही आपण देत आहोत. राज्याचे दरडोई उत्पन्न अन् कर्जाची तुलना पाहा. रिझव्र्ह बँकेचे आकडे पहा, विरोधकांना केवळ गुजरातची आरती ओवाळायची आहे. पण, गुजराती माणसे महाराष्ट्रात येऊन येथे महाराष्ट्राच्या संपत्तीत भर घालतात. महाराष्ट्रातील किती लोक गुजरातमध्ये जाऊन व्यापार करतात. आणि तेथील किती लोक महाराष्ट्रात येण्यात धन्यता मानतात याचा सर्वानी विचार करावा. विकासाच्या अनेक आघाडय़ांवर महाराष्ट्र देशात अव्वल असताना, महाराष्ट्रातील काही जण स्वार्थापोटी जाणीवपूर्वक अपप्रचार करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. येथून भाजपसाठी मते मागणाऱ्यांना महाराष्ट्राचे विभाजन चालेल का,असा सवाल करीत आधी महाराष्ट्राचे विभाजन मान्य आहे का, ते सांगा आणि मगच मते मागा,असे ते म्हणाले. ज्या राज्याने पुरोगामित्व जोपासले, स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी संघर्ष केला, लढे उभारले त्या भूमीतील जनता फडणवीस वा गडकरींना कदापि मुख्यमंत्री करणार नसल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेच्या निवडणुकीवेळी ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणणारे आज अच्छे दिनबाबत का बोलत नाहीत अशीही टीका त्यांनी केली. भाई जगताप यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ज्या अमित शहांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यांच्यावर दोषारोपपत्रही दाखल आहे. त्यांची महाराष्ट्राला संस्कृती शिकवण्याची लायकी नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराला नरेंद्र मोदी का आले नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा