वाई : मोदींकडे लोकसभेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा नसल्याने अपुऱ्या मंदिराचे उद्घाटन करून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
भाजपाकडे विकासाचा मुद्दा नसल्याने प्रभू श्रीरामाला निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या सोहळ्याला राष्ट्रपती व धर्मगुरूंना निमंत्रण देण्यात आलेले नाही. एकंदरीत पंतप्रधान मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. सुरुवातीला निवडणुकांसाठी आर्थिक मुद्दा घेतला. नंतर देशाच्या सुरक्षेचा मुद्दा घेतला. आता मोदींकडे निवडणुकांसाठी विकासाचा कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवाव्या लागत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी साताऱ्यामध्ये जो उमेदवार देईल तो उमेदवार आम्ही मोठ्या मताधिकार्या निवडून आणणार.
२०१४ च्या निवडणुकीत आर्थिक विकासाचा मुद्दा घेतला होता. त्यामध्ये आर्थिक मदत, रोजगार, १५ लाख रुपये देण्याची हमी देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा काढण्यात आला. पुलवामामध्ये ४० सैनिक मारले गेले. हुतात्मा झाले. याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यांची हत्या झाली. यानंतर चीनने आपल्या देशात आक्रमण केले. आपले २० सैनिक मारले गेले. मात्र लोकसभेत भाजपाने चीनने देशात आक्रमण केलेले नाही असे खोटे म्हणणे मांडले. या विषयावर लोकसभेत चर्चाही करण्यात आली नाही. संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था आता तर आणखी कडक करण्यात आली असून भाजपाला कोणत्याही विषयाची लोकसभेत संसदेमध्ये चर्चा करायची नाही. बाबरी मशिदीचा वाद हा अनेक वर्ष सुरू होता. त्यानंतर तो सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने ही जागा हिंदू ट्रस्टला दिली. हिंदू ट्रस्टने या ठिकाणी देणग्या जमा करून मंदिर बांधले. ही चांगली बाब आहे. मात्र मंदिर पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी उद्घाटनाचा घाट घातला आहे. या मंदिरांना पूर्ण व्हायला दोन-तीन वर्ष लागतील. मात्र आता हा धार्मिक मुद्दा बरोबर घेऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय कार्यक्रम आहे. याबाबत शंकराचार्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. घराणेशाहीबाबत मोदी खोटं बोलत आहेत. ते जे बोलतात ते बोलणं सोपं असतं. परंतु त्यांच्या व्यासपीठावरही कितीतरी परंपरेने आलेले लोक बसलेले असतात. मात्र ते गांधी घराण्याला समोर ठेवून आपले मत मांडत असतात. परंतु एकंदरीत माणसांची कार्यक्षमता त्यांनी दिलेली योगदान या गोष्टीही आपण पाहण्याची गरज असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांची बैठक काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लोकसभा विधानसभांच्या निवडणुकीत स्थानिक कमिट्या आघाड्या त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.