काँग्रेसमधून बाहेर पडून १९७८ च्या प्रतिकूल स्थितीत झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विजयात तोलामोलाची साथ देणारे ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या येथील नियोजित स्मारकाचे २ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मोकळे केले! शंकरराव चव्हाण यांचे नाव धारण करणाऱ्या शासकीय वैद्यक महाविद्यालय व रुग्णालयाच्या नव्या-भव्य संकुलाचे लोकार्पण करतानाच मुख्यमंत्र्यांनी हे औचित्य साधले.
या कार्यक्रमासह शहरातील अन्य काही उद्घाटने, तसेच भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नांदेड दौऱ्यावर आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वैद्यक शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.
गुरुवारी नांदेड शहरात येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे रखडलेल्या कुरुंदकर स्मारकाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी या विषयात मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नामुळे आधी ५० लाख रुपयांची तरतूद झाली होती. कुरुंदकर स्मारक समितीतर्फे दीपनाथ पत्की यांनी गुरुवारी सकाळी राजूरकर यांची याच विषयावर भेट घेतली. दोन आठवडय़ांपूर्वी ‘लोकसत्ता’नेच ‘धोरण लकव्यामुळे कुरुंदकर स्मारकाचा निधी अडकला’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कुरुंदकरांच्या नियोजित स्मारकासाठी पूर्वीच मंजूर असलेले २ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याने कुरुंदकर स्मारकासाठी झटणाऱ्यांना सुखद धक्का दिला.
शहरातील नांदेड एज्युकेशन सोसायटी परिसरात याच संस्थेने कुरुंदकर स्मारकास जागा उपलब्ध करून दिली. सुमारे चार वर्र्षांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. परंतु सरकारने अर्थसंकल्पात २ कोटींची तरतूद केली, तरी प्रत्यक्षात ती हाती पडलीच नाही. मागील ४ वर्षे सतत पाठपुरावा झाल्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या शेवटच्या नांदेड दौऱ्यात पृथ्वीराजबाबा एका थोर विचारवंतावर प्रसन्न झाले.
दरम्यान, नियोजित स्मारकाच्या बांधकामासंबंधीची निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे स्मारकाचे काम मार्गी लागणार असले, तरी २ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता ८ कोटींवर गेला आहे. ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ असा अनुभव संबंधितांना सतत आला. पुढच्या काळात हे काम रखडले जाऊ नये, अशी अपेक्षा कुरुंदकरप्रेमींनी व्यक्त केली.
वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाच्या नव्या संकुलाच्या उद्घाटनासह उद्योगभवन, तसेच परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी कालच्या धावत्या दौऱ्यात केले. शहरातील पश्चिम वळण रस्त्याच्या गोदावरी नदीवरील पुलाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूरमधील सार्वजनिक कार्यक्रमाकडे पाठ फिरवून नांदेड दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय निधीतून बांधण्यात येणाऱ्या वरील पुलाचे भूमिपूजन उरकले असले, तरी या कामासाठी अजून कंत्राटदार ठरला नाही, असे सांगण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी हा घाट घातला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नांदेडमधील सेफ सिटी प्रकल्पाचे उद्घाटन केले. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत हा प्रकल्प कार्यान्वित झाला. त्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हा प्रकल्प पाहून मुख्यमंत्री प्रभावित झाले.

Story img Loader