विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ८ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही उपस्थित असल्याचं वृत्तपत्रात सांगितलं आहे. यामुळे अजित पवार भाजपाबरोबर जाणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हटलं वृत्तपत्रात?
वृत्तपत्रात सांगितलं की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर, अजित पवारांना भाजपाबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांचा पाठिंबाही आहे. पण, शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत.”
हेही वाचा : “अजित पवारांची अमित शाहांबरोबर…”, संजय शिरसाटांचा मोठा दावा; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
तसेच, “८ एप्रिल रोजी अजित पवारांनी दिल्ली येथे अमित शाहा यांची भेट घेतली होती. दिल्लीला जाण्यासाठी अजित पवारांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला होता. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही होते. या बैठकीत संभाव्य मंत्रीपदाच्या खातेवाटपाबाबत चर्चा झाली आहे,” असेही वृत्तपत्रात सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा : पवार कुटुंबियांवर भाजपाकडून दबाव; खासदार संजय राऊत यांचा नागपुरात गौप्यस्फोट
याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला आहे. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “अजित पवार दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटले की नाही? हे त्यांनाच विचारावं लागेल. ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांची भेट काही कामासाठी किंवा राजकीय गोष्टीसाठी होती माहिती नाही. पण, मुळात भेटले का नाही, याचे कोणीतरी खात्रीलायक स्पष्टीकरण दिलं पाहिजे. त्यामुळे या तर्कावर चर्चा करण्याची गरज नाही.”