Prithviraj Chavan On Meeting with Donald Trump : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु झालं आहे.या निमित्ताने ट्रम्प हे जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीचा मुद्दादेखील चर्चेत आला आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपण डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलो नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि ट्रम्प यांच्या भेटीबद्दल काही पोस्ट करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्याशी आपली कधीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने मुंबईतील एका बिल्डरबरोबर भेट घेतली होती असेही चव्हाण यांनी सांगितले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझ्या कथित भेटीबद्दल काही वाईट भावनेने करण्यात आलेले ट्विट पाहिले आहेत. लोकांना चुकीची समज दूर करण्यासाठी, स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कधीही भेट झाली नाही. २०११ मध्ये त्यांचा मुलगा मला भेटायला आला होता. मी त्यांना नियोजित वेळी भेटलो आणि ती एक औपचारिक भेट होती”.
“मिस्टर ट्रंप, ज्युनियर हे वेळ घेऊन मुंबईतील एका बिल्डरबरोबर आले होते. त्यांना मुंबईतील काही प्रकल्पासाठी परवानगी हवी होती, जी योग्य तपासणीनंतर मंजूर देता आली नाही. त्यांना वाट बघायला लावण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच नव्हता. कोणही जर भेटीसाठी नियोजित वेळ घेतली असेल तर मी कोणालाही वाट पाहण्यास भाग पाडले नाही”, असेही पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.