काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं आहे. पण, ‘वंचित’चा ‘इंडिया’ आघाडीमध्ये समावेशाबाबत आधी निर्णय घ्या, त्यानंतरच यात्रेत सहभागी होता येईल, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“‘इंडिया’ आघाडीत २८ पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत यायचं असेल, तर मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घ्यावी. प्रकाश आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, याची माहिती नाही. मल्लिकार्जुन खर्गेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे?” असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य काय ?
“दोन पक्षात फूट पडल्यानं मतदारांचं आकलन करण्यास वेळ”
“महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा चालू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं नेते, मतदारांचं आकलन करण्यास वेळ लागत आहे. अशी परिस्थिती इतर कुठेही झाली नाही,” असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
“भाजपाला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही”
“भाजपाचा आत्मविश्वास ढळला आहे. भाजपाचं २०१४ मध्ये आर्थिक आणि २०१९ साली राष्ट्रीय धोरण फसलं आहे. आता प्रभू श्री राम मंदिराचा विषय भाजपानं समोर आणला आहे. पण, भाजपाला यश मिळत नाही. म्हणून ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत. तरीही, भाजपाला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. ही लोकसभा निवडणूक सोप्पी नसल्याचं भाजपाला कळून चुकलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत,” अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.
हेही वाचा : विश्लेषण: ४०० जागांवर भाजप विरुद्ध ‘इंडिया’ आघाडी थेट लढत? प्रत्येक राज्यात लढतीचे स्वरूप कसे असेल?
“लबाड्यांना जनता बळी पडणार नाही”
“नेते कुठेही गेले, तरी कार्यकर्ते आणि मतदार कुठे आहेत, हे महत्वाचं आहे. जातीयवादी पक्षाकडे नेते गेल्यानं मतदारांचं मत बदलेन, असं नाही. नेते जातीयवादी पक्षात गेल्यानं मतदारांचे विचार बदलतील, असं नाही. महाराष्ट्रातील जनता विचार सोडणार नाही. लबाड्यांना जनता बळी पडणार नाही,” असंही चव्हाणांनी म्हटलं.