महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत शिवसेनेत बंडखोरी केली. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन नेत्यांबरोबर पक्षातले नेते विभागले गेले आहेत. दोन्ही गटातले नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते की, २०१४ मध्ये तुम्ही (भाजपाने) शिवसेना सोडल्यानंतर आम्हीपण काँग्रेस सोडू, आणि निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल, असं शरद पवार साहेबांनी भाजपासह आम्हाला सांगितलं होतं. भुजबळ यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तुम्ही छगन भुजबळ यांची मुलाखत नीट ऐकली असेल तर त्यांनी त्यात एक गोष्ट सांगितली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, त्यांचं (भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस) आधीच ठरलेलं होतं. आधी भाजपाने शिवसेनेची साथ सोडायची, मग राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची साथ सोडायची. त्यांनी असं २०१४ च्या निवडणुकीआधीच ठरवलं होतं. त्यामुळे आता तुम्ही काहीही कारणं सांगितली तरी त्याला काही अर्थ राहत नाही. त्या फुटीमुळे आघाडीचं नुकसान झालं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी फुटली नसती तर २०१४ ला आघाडी सरकार आलं असतं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेत आलीच नसती.