पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रतिमा स्वच्छ. त्यांचे मंत्रिमंडळ भ्रष्ट. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांचेही तसेच आहे. स्वतची प्रतिमा स्वच्छ, मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्ट. हे साधम्र्य पाहता पृथ्वीराज म्हणजे दुसरे मनमोहन सिंगच, अशी बोचरी टीका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे शनिवारी केली. ‘आदर्श’ अहवाल प्रकरणात मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह लावले. मुख्यमंत्रीच केवळ नाही, तर राज्यपालांनी निरपेक्ष भूमिका घेऊन ‘आदर्श’ प्रकरणात न्याय्य भूमिका घेणे आवश्यक होते. ते काँग्रेसच्या बाजूचे असल्याचे दिसून आल्याने त्यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे वा बडतर्फ करावे, अशी मागणी करणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात तिसरी शक्ती जन्माला येईल, असा दावाही त्यांनी केला.
‘आदर्श’ प्रकरणी ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास नकार देऊन राज्यपालांनी निरपेक्ष काम करणार नसल्याचे दाखवून दिले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या कृतीवरून त्यांना देशाच्या संरक्षणाविषयीही काळजी नसल्याचेच दिसून आले आहे. १९९६मध्ये माजी न्या. चनप्पा रेड्डी यांनी केलेल्या अभ्यासानुसार मुंबईचा संपूर्ण इतिहास पुढे आला आहे. ही संपत्ती पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे कशी आली, येथून ते मुंबईसाठी काढलेल्या अध्यादेशापर्यंतची माहिती त्यात आहे. चौकशीनंतर ज्यांच्यावर ठपका ठेवला, त्याविषयीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी का नाकारला याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. महसूल अथवा नागरी विकास खाते नसतानाही जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांची नावे आली आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगायला हवे होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा पंतप्रधानांसारखीच झाली आहे.
‘पृथ्वीराज म्हणजे दुसरे मनमोहनसिंग’!
पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रतिमा स्वच्छ. त्यांचे मंत्रिमंडळ भ्रष्ट. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांचेही तसेच आहे. स्वतची प्रतिमा स्वच्छ, मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्ट
First published on: 22-12-2013 at 02:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan second manmohan singh prakash ambedkar