गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत यासंदर्भात अंतिम निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. आता अवघ्या दोन दिवसांवर ही तारीख आल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय देणार? यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी भाजपाच्या राजकीय धोरणावर टीकास्र सोडलं. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारनं पुढे ढकलल्या. त्यांना हे लक्षात आलं की असंच आपण पुढे गेलो, तर आपलं काही खरं नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीचा विचार करता असं एकही राज्य नाही की जिथे भाजपाची लोकसभेची संख्या वाढेल. कारण काही राज्यांमध्ये ते सर्वोच्च आकड्यावर आहेत. तिथे वाढण्याची शक्यता नाही. इतर ठिकाणी राजकीय परिस्थितीमुळे ते वाढणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रावर त्यांचं लक्ष केंद्रीत झालं आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले.

“पहिला प्रयोग शिवसेनेवर तर दुसरा राष्ट्रवादीवर”

“महाराष्ट्रात भाजपाच्या २३ जागा आहेत. त्या वाढवून किती करता येतील याचा भाजपा विचार करत आहे. जुन्या समीकरणात त्यांच्या १० जागाही आल्या नसत्या. त्यामुळे एकेक प्रयोग झाले. पहिला प्रयोग शिवसेनेवर झाला, दुसरा राष्ट्रवादीवर झाला. अजूनही त्यांचे प्रयोग थांबलेले नाहीत. आता त्यांना वाटतंय की आपण निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. “या सगळ्या प्रकारामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही, तर आपल्याला संधी मिळेल असा त्यांचा प्रयत्न चालू आहे”, अशा शब्दांत चव्हाण यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.

“विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला; म्हणाले, “खोट्याच्या कपाळी…”

पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक विधान…

“पक्षांतरबंदी कायद्याचं १०० टक्के उल्लंघन झालेलं आहे. आता राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घ्यावा लागेल. पण विधानसभेचे अध्यक्ष एका पक्षाचे आमदार आहेत. ते पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय देतील का? हा निर्णय एक-दोन दिवसांत होईल. बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. पण जो काही निर्णय होईल, तो पूर्णपणे राजकीय असेल. तो निर्णय कायद्याला धरून नसेल. कायद्याला सोडून जर निर्णय झाला, तर सर्वोच्च न्यायालय काय करणार हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरून निर्णय घेईल का? हे पाहावं लागेल. त्यानुसार राजकारणाची बरीच समीकरणं पुन्हा लिहावी लागतील. १० तारखेला शिवसेनेच्या पक्षांतरावर काय तो निर्णय होऊ द्या. त्यानंतर पुढे काय होतंय ते बघू”, असं सूचक विधानही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

“पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे. ते यातून अंग काढून घेण्याचीही शक्यता आहे. कारण कुणी म्हणतं राजीनामा देतील, कुणी म्हणतं आजारी पडतील, कुणी म्हणतं वेळ वाढवून मागतील. त्यांनी जर त्यातून अंग काढलं आणि निर्णय घेतला नाही, तर मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पहिला निर्णय घ्यावा लागेल. तो पहिला राजकीय भूकंप असेल”, अशी शक्यताही पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan slams bjp on rahul narvekar verdict shivsena mla disqualification case pmw