Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress: काँग्रेसचे राज्यातील वरीष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच, अशोक चव्हाण यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आपल्या राजीनाम्यासाठी कोणतंही कारण नसून वगळा पर्याय पाहायला हवा असं वाटलं म्हणून निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रविवारी घडलेल्या घडामोडींबाबत यावेळी ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजीनाम्याबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. “मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन”, असं अशोक चव्हाण म्हणाले. “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे”, असं ते म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पत्रकार परिषद

दरम्यान, अशोक चव्हाणांनी भूमिका मांडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना रविवारी अशोक चव्हाण पक्षाच्या बैठकीत सक्रीयपणे उपस्थित होते, असं ते म्हणाले. “अजून तरी अशोक चव्हाण यांनी पुढची काही भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते जन्मापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेससाठी खूप काही केलं हे ते सांगत होते. काँग्रेस आत्ताही त्यांना मोठी संधी देत होती. कालच आमच्या महाराष्ट्र प्रभारींसमवेत ज्येष्ठ नेते, अशोक चव्हाण यांची रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. संध्याकाळी ४-५ वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते. त्यांच्या डोक्यात असं काही असेल असं वाटलं नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपाच्या ऑपरेशन लोटसचा भाग?

“काल बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण बाळासाहेब थोरातांना सांगून गेले की उद्या सकाळी ११ वाजता, म्हणजेच आज भेटून पुढची चर्चा चालू ठेवू. काँग्रेस पक्षाकडून जागावाटपाबाबत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेसनं त्यांना मोठी संधी दिली होती. मोठा विश्वास टाकला होता. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळातही ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. हा भाजपाच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?”, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

“महाराष्ट्र काँग्रेसचा एकही आमदार चव्हाणांसोबत जाणार नाही”

“या सगळ्या प्रकाराबाबत भाजपाच्या नेतृत्वाकडून असं काही घडेल असे सूतोवाच होत होते. आज आम्ही काही पदाधिकारी, नेते बसून काँग्रेस विधिमंडळ सदस्यांना संपर्क केला आहे. उद्या आणि परवा राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी विधिमंडळ सदस्यांची बैठक घेतली जाईल. कोणताही आमदार त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाहीये. भाजपाकडून वावड्या उठवल्या जात आहेत. पण त्यावर विश्वास ठेवू नये”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Ashok Chavan : काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, भाजपात जाण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देत म्हणाले…

“हे सगळं कशामुळे घडतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. भाजपामध्ये लोकांमध्ये निवडणुकाला सामोरं जायचं धाडस नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांचं विभाजन करून काही संधी मिळतेय का? याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे नेते जरी गेले तरी त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मत देणारे मतदार व सर्वसामान्य जनता या नेत्यांबरोबर कधीही जाणार नाही. निवडणुकांमध्ये खरं चित्र दिसून येईल. त्यांना का हा निर्णय घ्यायला बाध्य केलं गेलं हे कळत नाही. ते कदाचित एक-दोन दिवसांत सांगतील. त्यांना कशाची भीती होती हे तेच सांगतील”, असं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan speaks on ashok chavan resigned from congress pmw