सातारा : विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग आणि सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहे. निवडणूक आयोग आणि सरकारने निकालाबाबत जनतेला विश्वास देणे गरजेचे आहे. परंतु ते जनतेला गृहीत धरत आहेत. निवडणूक निकाल आणि प्रक्रियेबाबत लोकांचा गैरसमज होईल, असे वर्तन निवडणूक आयोगाकडून होता कामा नये. लोकांना निवडणूक प्रक्रियेवर भरवसा राहिला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. सातारा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळच्या निवडणूक निकाल हा अनपेक्षित होता. त्यामुळे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर एवढा बदल कशामुळे झाला. सत्ताधारी पक्ष जी कारणे सांगत आहे, खरंच ती कारणे होती काय. याबाबतचे विश्लेषण सध्या सुरू आहे. पराभवानंतर आत्मपरीक्षण आणि विश्लेषण करावीच लागतात. लोकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि सरकारची आहे. लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत गैरसमज होऊन त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडाला तर देशात लोकशाहीच राहणार नाही.
हेही वाचा >>>सोलापूरसाठी स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळण्याची अपेक्षा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हॅक हा तांत्रिक मुद्दा आहे. हॅक म्हणजे मतदान झाले. मतदान यंत्र सील केले आणि बाहेरून ऑपरेट केले असे होऊ शकत नाही. जे मतदान यंत्र वापरण्यात आले त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काही दोष आहेत का, हे तपासायला हवे. लोकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्या मोजाव्यात. ज्यांना शंका आहे त्या उमेदवारांनी मतमोजणीचे पैसे भरावेत.
न्यायालयाची आणि पोलिसांची भीती दाखवून तुम्ही लोकांचा विचार दडपू शकत नाही. पारदर्शक आणि निर्भय वातावरण निवडणूक प्रक्रिया राबविणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे. आताच्या प्रक्रियेत जे लोक निवडून आले त्यांनीही या प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आत्ताच्या प्रक्रियेबाबत अनेक लोक मत व्यक्त करत आहेत. आम्ही तर या पुढच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू करत आहोत. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
जरी विधानसभेत मोठ्या संख्येने विरोधी पक्षाचे सदस्य निवडून आले नसले तरीही आम्ही रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत. लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला धारेवर धरायचे काम मी करणारच आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मारकरवाडी येथे मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत ग्रामसभेने निर्णय घेतला होता. तेथील ग्रामसभेला नागरिक म्हणून सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तिथे शासनाने दडपशाही करून खटले भरणे, लोकांना धमक्या देणे हे गैर आहे. तिथल्या लोकांनी कोणता कायदा मोडला, हे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा सांगायला हवे. निवडणूक प्रक्रियेविषयी तिथल्या नागरिकांचा प्रश्न आहे. आमचे सर्व प्रश्न निवडणूक आयोगाला आहेत. निवडणुकी संबंधित विषय असल्याने एक तर निवडणूक आयोगाने लोकांच्या प्रश्नांचे निरसन करावे अथवा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन लोकांचे समाधान करावे. लोकांनी न्यायालयात जायचा प्रश्नच नाही. सरकार उत्तर देत नसेल तर लोक जनतेच्या दरबारात जातील.- पृथ्वीराज चव्हाण