दिगंबर शिंदे

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने संधी दिली असून सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. विधान परिषदेची भाजपची हक्काची जागा असल्याने यावेळी पक्षातील निष्ठावंतांपकी कोणाला तरी संधी दिली जाईल, असे वाटत असतानाच अचानकपणे देशमुख यांचे नाव निश्चित झाले. यामुळे निष्ठावंत गट हे केवळ प्रचारासाठी असल्याची भावना निर्माण झाली आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळ कमी असल्याने काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली जाण्याची शक्यता कमी असल्याने देशमुख यांची निवड अविरोध होण्यात सध्या तरी अडचण वाटत नाही. या आमदारपदासाठी केवळ ११ महिन्यांचा कालावधी आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत देशमुख यांची दावेदारी होती. यासाठी भाजपमध्ये त्यांनी यावे असा प्रयत्न सुरू होता. मग वंचित आघाडीकडून मदानात उतरलेले गोपीचंद पडळकर यांना ही जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यांनीही नकार दिला. या सर्व बाबी लोकसभा निवडणुकीतील व्यूहरचना म्हणून सुरू होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत फारशी तडजोड न करता संजयकाका पाटील यांचा विजय झाला. यामुळे कोणालाही शब्द दिलेला नसल्याने या पदासाठी पक्षाचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर आणि पृथ्वीराज देशमुख यांची नावे या स्पर्धेत होती. आगामी विधानसभा निवडणुकीवेळी कडेगावच्या देशमुख घराण्यातील भाऊबंदकी वर येऊ  नये यासाठी पृथ्वीराज देशमुख यांना आमदारकीची संधी दिली असे मानले जाते.

पलूस-कडेगाव हा माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पारंपरिक मतदारसंघ. मात्र याच मतदारसंघामध्ये काँग्रेसअंतर्गत राजकारणात डॉ. कदम यांना शह देत संपतराव देशमुख यांना अपक्ष म्हणून संधी देण्यात काँग्रेसच्या धुरिणांनी प्रयत्न केले. मात्र देशमुख यांचे अकाली निधन झाल्याने झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये डॉ. कदम यांच्या विरुद्ध मदानात उतरून पृथ्वीराज देशमुख यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता होती. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत कदम-देशमुख असा सामना या मतदारसंघाने पाहिला आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी भाजपने देशमुख यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देऊन सत्तेजवळ राहण्याचा मान दिलाच, याचे फळ पक्षाला जसे मिळाले तसेच कडेगावच्या देशमुख घराण्यालाही मिळाले. जिल्हा परिषदेत सत्ता येताच अध्यक्षपद देशमुख यांचे चुलत बंधू स्व. आ. संपतराव देशमुख यांचे चिरंजीव संग्रामसिंह देशमुख यांना देण्यात आले असून सध्या त्यांच्याकडेच हे पद आहे.

डॉ. कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाने संग्रामसिंह देशमुख यांना पक्षाची उमेदवारी दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेऊन विश्वजीत कदम यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर केला. तथापि येत्या विधानसभेसाठी संग्रामसिंह देशमुख यांची भाजपकडून उमेदवारी अंतिम मानली जात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पक्षाचे जिल्हाध्यक्षपद, आणि आता विधान परिषदेचे सदस्यत्व अशी पदे एकाच घरात दिली जात असल्याने भाजपमध्ये अन्य कोणी पात्र नाही का, असा प्रश्न पडतो.

Story img Loader