ज्या मार्गावर जादा प्रवासी मिळतील, अशाच मार्गावर खासगी प्रवासी गाडय़ा धावतात. त्या तुलनेत एसटी महामंडळाच्या बसेस कमी प्रवासी संख्या असणाऱ्या दुर्गम भागांतही सेवा देतात. यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागतो. हा तोटा भरून काढण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूकदारांवर आता कर लादण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे केली. त्यामुळे खासगी प्रवास महागणार आहे. एसटीचे खासगीकरण कदापि करणार नाही, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.
खासगी वाहतूकदार केवळ नफा मिळणाऱ्या मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. त्यातही ते अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. कोणाचे र्निबध नसल्यासारखी त्यांची कार्यशैली आहे. एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या वाहतूकदारांवर कर लादला जाणार आहे. केंद्र सरकार खासगी भ्रमणध्वनी कंपन्यांकडून या पद्धतीने कर आकारते आणि कराच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तोटय़ात चालणाऱ्या आपल्या भ्रमणध्वनी कंपनीला अनुदान स्वरूपात देते. याच धर्तीवर खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून कराद्वारे मिळणारी रक्कम एसटीसाठी वापरली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाचे खासगीकरण कदापी होऊ दिले जाणार नाही. उलट एसटी बसस्थानक व बस थांब्यांचे नूतनीकरण, बसला ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविणे, संगणकीकरण आदी कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. आमदार जयप्रकाश छाजेड यांनी एप्रिल २०१२ पासून कर्मचाऱ्यांना कराराची थकबाकी देण्याची मागणी केली होती. ही रक्कम मार्चपर्यंत दोन हप्त्यांत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अधिवेशनास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीवा रेड्डी आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी महामंडळ आणि खासगी वाहतूकदार हे दोघेही वाहतूकदारच आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये भेदभाव करणे चुकीचे आहे. तरीही सरकारने कोणताही नवा कर सादला गेला तर आम्ही न्यायालयात जाऊ. खासगी वाहतूकदार सध्या जिथे जिथे जातात तेथे चांगला रस्ता वापरण्यासाठी ते ३ रुपये ७० पैसे प्रति किलोमीटर इतका टोल भरतात. त्यामुळे खासगी वाहतूकदार हा रस्ता फुकट वापरत नाहीत. एसटी खेडोपाडी जात असली तरी त्या रस्त्यांवर एसटीला कोणताही टोल भरावा लागत नाही.
हर्ष कोटक, खासगी वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा