सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी प्रसंगी खासगी क्षेत्राची मदत घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले. या योजना पूर्ण करण्यासाठी अद्याप मोठय़ा प्रमाणावर निधीची गरज असून शासनाकडे उपलब्ध निधीतून या योजनांची जेवढी कामे करता येतील ती अग्रहक्काने करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीसाठी हक्काचे पाणी देण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू या पाणी योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. हा निधी अंतिम टप्प्यात असून योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी निधीची गरज आहे. मात्र सध्यस्थितीत या योजनांना विदर्भाच्या अनुशेषामुळे निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी वाटत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हैसाळ आणि टेंभूसाठी निधी मिळावा यासाठी राज्यपालांकडे प्रयत्न केले आहेत. शासनाकडून जेवढा निधी मिळेल त्या निधीतून योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र निधीअभावी जर योजना रखडण्याची चिन्हे दिसत असतील तर योजना खासगी क्षेत्राकडून पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. दुष्काळी जनतेला कोणत्याही परिस्थितीत पाणी देण्यास आम्ही बांधील आहोत असे खा. पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या एक वर्षांच्या कालावधीत रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून यामुळे कोल्हापूर-पुणे मार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होईलच पण त्याचबरोबर या भागाच्या विकासाला चालनाही मिळेल. अधिकारी नियुक्त करीत असताना विदर्भाला प्राधान्य देण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले असता पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र विकासापासून वंचित असलेल्या भागाला झुकते माप देण्यात गर काही नाही.
पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालू झाली तरच हे पाणी सामान्य शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात मिळेल. म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्याच्या कामाबरोबरच जत तालुक्यातील पोटकालव्याची कामेही पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत, त्याचा चांगला लाभ सर्वसामान्य लोकांना होत आहे. अनेक योजना काही अडचणीमुळे रखडल्या असून त्या अडचणी दूर करण्यातच एक वर्ष गेले असून यापुढील काळात विकासाला गती मिळेल असेही त्यांनी सांगितले.
म्हैसाळ, ताकारी, टेंभूसाठी खासगी क्षेत्राची मदत घेणार
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीसाठी हक्काचे पाणी देण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू या पाणी योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. हा निधी अंतिम टप्प्यात असून योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी निधीची गरज आहे.
First published on: 17-05-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private sector will help for mhaisal takari and tembhu