महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीनिमित्त “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून गोविंदाना शासकीय नोकरी देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य शासनाने दहीहंडी (गोविंदा) या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. आता “प्रो गोविंदा” स्पर्धा राबवण्यात यावी, अशी मागणी दहीहंडी उत्सव आयोजकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्यात ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा आयोजित केल्या जातील. या स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम शासनामार्फत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
स्पेन व चीन या देशांमध्ये मानवी मनोरे (पिरॅमिड) म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश आहे. आपल्याकडे असलेल्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही क्रीडा प्रकारात समावेश होईल, असंबी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.