आर. आर. पाटील यांच्यामुळे सांगलीत राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे संकेत आ. संजय (काका) पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिले.  गृहमंत्री पाटील यांनी तोंड आवरावे अन्यथा आम्हालाही कमरेखाली वार करण्याची वेळ येईल, असेही त्यांनी सांगितले.
संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील व दिनकर (आबा) पाटील यांचे चिरंजीव अविनाश पाटील यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी आरवडे (ता. तासगांव) येथील मेळाव्यात जाहीर केला. या वेळी गृहमंत्र्यांनी संजय पाटील यांच्यावर आरोप करीत असताना आक्रमक भाषेत, कोणाला कोठे जायचे तिकडे जाऊ देत असे आव्हान दिले होते.
सोमवारी पत्रकार बैठकीत गृहमंत्र्यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेताना संजय पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही नेते मंडळी आर.आर.पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळे वैतागले आहेत. जतचे विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजित घोरपडे, आटपाडीचे राजेंद्र देशमुख आदी मंडळी गृहमंत्र्यांच्या कुटिल राजकारणामुळे वेगळा विचार करू लागले आहेत.  राष्ट्रवादीच्या फुटीला गृहमंत्रीच जबाबदार राहतील, भल्याभल्यांना घाम फोडला आहे असे सांगणा-या आर.आर. यांनाच केवळ आमच्या भाजपा प्रवेशाच्या चच्रेने घाम फुटला आहे.  लोकसभेसाठी भाजपाची उमेदवारी मिळते या चच्रेनेच त्यांचा थयथयाट सुरू आहे.  
विकासाच्या मुद्यावर आम्ही राजकीय संघर्ष टाळण्यासाठी तडजोड केली होती.  मात्र कपटी मत्रीने राजकीयदृष्टय़ा संपुष्टात आणण्याचे कृष्णकारस्थान रावणाच्या प्रवृत्तीचे असल्याने आम्हाला वेगळा विचार करावा लागत आहे.  आमच्यावर आरोप करण्याऐवजी तासगांव कारखान्याबाबत समोरासमोर चच्रेस आपण तयार आहोत.  त्या वेळी सद्य:स्थितीला कोण जबाबदार आहे हे समोर येईल.
गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कारकिर्दीत महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत हे आझाद मदानावरील मोर्चावेळी स्पष्ट झाले आहे.  मुंबई पोलीस आयुक्तांचा राजीनामा मंजूर होण्यापूर्वी भाजपा प्रवेश होतो हे कशाचे लक्षण आहे? सांगली जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारणा-या सुझलॉनचे दलाल कोण आहेत?  पोलीस खात्यातील सेक्स स्कॅन्डलला कोणाचे आशीर्वाद आहेत, याची चौकशी झाली तर ब-याच भानगडी उजेडात येतील.  गृहमंत्र्यांच्या दिमतीला असणारे खासगी सावकार कोणाच्या संरक्षणात उद्योग करतात याचीही चौकशी व्हायला हवी.
संजय पाटील पुढे म्हणाले की, गृहमंत्री पाटील ठेकेदारांची वकिली करीत असून कोटय़ावधी रुपयांची वाळू, मुरूम चोरी आम्ही उघडकीस आणली.  शासकीय अधिका-यांसमवेत पंचनामे केले, मात्र या ठेकेदारांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांना वाचविण्याचाच उद्योग सुरू आहे.
 लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून आपण िरगणात उतरणार का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, येत्या ८ दिवसांत या बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.  भाजपाच्या काही नेत्यांनी या संदर्भात आपल्याशी संपर्क साधला आहे.  मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच हा निर्णय घेतला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघात असणा-या मित्रांशी आपण संपर्क साधला असून त्यांच्याशी चच्रेनंतर भूमिका स्पष्ट केली जाईल असे ते म्हणाले.

Story img Loader