काही ठिकाणी भूसंपादनात येणाऱ्या अडचणींमुळे पुणे-नाशिक मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडण्याची चिन्हे आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या बोटा ते सिन्नपर्यंतच्या कामाचा अपवाद वगळता उर्वरित मार्गासाठी भूसंपादनाची आडकाठी आहे. त्यामुळे आधीच विलंब झालेल्या या मार्गाच्या प्रकल्पाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुंदीकरणासाठी मार्गाच्या दुतर्फा असलेली मोठमोठय़ा वडांची कत्तल करण्यात आल्याने संपूर्ण मार्ग ओकाबोका वाटू लागला आहे. त्यामुळे रुंदीकरणाबरोबरच नवीन झाडे लावण्याची मागणीही केली जात आहे.
संगमनेरमध्ये नऊ किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होत नाही तोच या रस्त्यालगत चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात झाली. त्यामुळे संगमनेरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुणे ते नाशिकपर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करून त्याच्या निविदादेखील काढण्यात आल्या. कामासाठी कंत्राटदारही निश्चित झाला आहे. पुणे ते राजगुरुनगपर्यंत या मार्गाचे चौपदरीकरणाचे कामदेखील याआधीच पूर्ण झाले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राजगुरुनगर ते नाशिकपर्यंतचे काम कधी सुरू होते याची पुणे, नाशिक व संगमनेरकरांना उत्सुकता होती. संगमनेरच्या बाह्यवळण मार्गाच्या उद्घाटनावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी उर्वरित चौपदरीकरणाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
संगमनेरसह सिन्नर तालुक्यातून जात असलेल्या या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, जमीन सपाटीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार निश्चित होताच, संगमनेरमध्ये तातडीने काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाह्यवळण मार्गालगतच्या कामालाही लगेच सुरुवात झाली. संगमनेरच्या काही भागांत शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न वगळता जमिनीचे भूसंपादन झालेले असल्याने काम सुरू करण्यात आले. या कामाला काही शेतकऱ्यांनी हरकतदेखील घेतली, मात्र चर्चेअंती हा प्रश्न निकाली निघाला. एकीकडे सिन्नर ते बोटा हे काम प्रगतिपथावर असताना बोटय़ाच्या पुढे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत मात्र कोठेही चौपदरीकरणाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तर सिन्नर ते नाशिक दरम्यानही या कामासाठी भूसंपादनाच्या वादाची आडकाठी आली आहे. सिन्नर ते नाशिक आणि बोटा ते राजगुरुनगर हे काम तातडीने पूर्णत्वास जाण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत.
याशिवाय पुणे ते नाशिकपर्यंतच्या संपूर्ण मार्गालगत विस्तीर्ण वडाची हजारो झाडे होती. त्यापैकी संगमनेरच्या हद्दीतील झाडांनी केव्हाच अखेरचा श्वास घेतला आहे. झाडेच नष्ट झाल्याने संपूर्ण मार्ग सुनासुना वाटतो, शिवाय उन्हाच्या झळाही लाहीलाही करतात. निरुपाय म्हणून झाडे तोडल्याचे मान्य केले तरी नवीन मार्गाची हद्द निश्चित झाल्याने दुतर्फा लागलीच दीर्घायुषी झाडे लावण्याची मागणी केली जात आहे.
 

Story img Loader