लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर नेवासे तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. त्यांच्यात घडवून आणलेली तडजोड ही केवळ लोकसभेच्या प्रचारकाळातच टिकली. काँग्रेस नेत्यांनी शब्द फिरवल्याने कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे अडचणीत आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख यांनी प्रचार करावा म्हणून कृषिमंत्री विखे यांनी बैठक घेतली होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी त्या वेळी दिलेला शब्द निवडणुकीनंतर फिरविला. मुरकुटे हे तालुक्याच्या राजकारणात भाजप-सेनेला मदत करतात, ताकद मात्र काँग्रेसची वापरतात. विखे यांचे त्यांना पाठबळ मिळते, त्यामुळे गडाख नाराज होते. त्यांनी वाकचौरे यांचा प्रचार थांबवला होता. पण विखे यांनी केलेल्या तडजोडीनंतर गडाख यांनी प्रचार सुरू केला. आता निवडणूक संपल्यानंतर मुरकुटे यांनी पुन्हा गडाख यांच्या विरुद्ध मोहीम उघडली आहे. त्यांची युती ही तकलादू होती, हे स्पष्ट झाले आहे. मुळा धरणाच्या आवर्तनावरून गडाख व मुरकुटे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघेही पुन्हा एकदा पाणीप्रश्नावर राजकारण करण्यास सरसावले आहेत.
मुळा धरणात पाणीसाठा भरपूर असताना व रब्बीचे नियोजन चांगले झाल्यामुळे उन्हाळी आवर्तन होणारच होते. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्वाच्या नजरा उन्हाळी आवर्तनाकडे होत्या, मात्र निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी अडकल्याच्या कारणाने निवडणुकीनंतर त्वरित पाण्याची ओरड सुरू होणार हे सर्वच राजकारणी व अधिकारी यांना माहिती होते. त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीच्या तिसऱ्या दिवशी आमदार गडाख यांनी मेळावा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला व अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याच दिवशी मुळा धरणातून आवर्तन सुरू झाले.
दरम्यान, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुरकुटे यांनी मात्र पाणी सोडावे असे निवेदन आम्ही आधीच दिले होते, असे सांगत आमदार गडाख मुळाच्या आवर्तनाबाबत जनतेच्या डोळय़ांत धूळ फेकून दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. पाणी न सुटल्यास आपणही आंदोलन करणार होतो असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकारी व पदाधिकारी यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने पाणी उशिरा आले त्यामुळे कालवा समितीचे प्रमुख आमदार असतानाही जनता, शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. तसेच तालुक्यात अजून एक थेंबही आला नाही तोच जाहिरातबाजीदेखील आमदारांनी केल्याचा आक्षेप मुरकुटे यांनी नोंदवला आहे.
पाणी आवर्तन सुटल्यामुळे नेवासे तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांचा व जनावराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहेच, शिवाय पाटावर अवंलबून असलेल्या व पाण्याचा ताण बसलेल्या ऊसक्षेत्राला मात्र फायदा होणार आहे.
लोकसभा होताच दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी
लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर नेवासे तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
First published on: 24-04-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem in ncp and congress after lok sabha election