सोलापुरातील भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी शेजारच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे त्याचे पडसाद उस्मानाबादबरोबरच सोलापुरातील शिवसेनेत उमटले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी महायुतीची डोकेदुखी दिसून येते.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुभाष देशमुख यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा सोलापुरात पराभव केला होता. तत्पूर्वी, त्यांनी विधान परिषदेवरही प्रतिनिधित्व केले होते. मागील २००९ साली त्यांनी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात लढत दिली होती. लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारखाने, बँक, पतसंस्था, शिक्षण संस्था उभारून देशमुख यांनी आपल्या कार्याचे जाळे विणलेले आहे. परंतु अलीकडे ते पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. तशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी उस्मानाबादमधून शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवी गायकवाड यांच्या विरोधात बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या या बंडखोरीमुळे उस्मानाबादेत शिवसेनेची अडचण झाल्याने त्याबद्दल सोलापुरात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. त्याचा राग म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांच्या प्रचार कार्यात सहभागी होताना दिसत नाहीत. गेल्या २४ मार्च रोजी अॅड. बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजिलेल्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अक्षरश: मिन्नतवारी करावी लागली. अखेरच्या क्षणी शिवसेना शोभायात्रेत सहभागी झाली खरी; परंतु त्यात सामान्य शिवसैनिकांचा अभाव होता. सद्यस्थितीत भाजपसोबत प्रचारासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिसत नाहीत. त्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचे ठरविले आहे. उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर व्हावा म्हणूनच रोहन देशमुख यांनी महायुतीच्या विरोधात बंडखोरी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्याशी संपर्क साधला असता, जोपर्यंत उस्मानाबादचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत शिवसेना सोलापुरात प्रचारात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या २९ मार्चपर्यंत तिढा सुटेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिक महायुतीच्या प्रचारासाठी सज्ज आहेत. परंतु उस्मानाबादचा तिढा सुटला नाही. त्यावर येत्या २९ मार्चअखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मार्ग निघेल व भाजपचे देशमुख हे माघार घेतील. त्यानंतर सोलापुरात शिवसेना तयारीनिशी प्रचाराच्या कामाला लागेल, असे ते म्हणाले. तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्यापि आदेश आला नसल्यामुळे आम्ही भाजपच्या प्रचारात सहभागी झालो नाहीत. आम्ही वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या आदेशाची वाट पाहात आहोत, असे सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख अस्मिता गायकवाड यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा