नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन अगदीच लांबल्याने कायम पाण्याचा सुकाळ अनुभवणारा कृष्णा, कोयनाकाठ हवालदिल झाला आहे. उष्म्याचा कहर जूनच्या तिसऱ्या आठवडय़ातही कायम असून, बहुतांश पाणीसाठवण प्रकल्प कोरडे पडले असून, कोयनेसह मोजके प्रकल्प तळ गाठून आहेत. परिणामी, पाण्यावरील ऊर्जानिर्मितीला मर्यादा आल्या असल्याने वीजकपातीचे संकटही गडद होऊ पाहात आहे. तर कडाक्याचा उन्हाळा चांगल्याच झळा देऊन भूमातेलाही मान्सूनच्या जोरदार सरींची आस असल्याने मान्सूनचे पहिले सत्र समाधानकारक होणे गरजेचे असताना, मान्सूनचा लहरीपणा बळीराजाला चिंतेच्या खाईत लोटत आहे.
१ जूनपासून कोयना धरणक्षेत्रात सरासरी १४४.६६ मि.मी. पाऊस झाला आहे. धरणाखालील पाटण तालुक्यात ६६, तर कराड तालुक्यात ६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात धरणक्षेत्रात हलक्याभारी सरी कोसळल्या, तर कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना पावसाच्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे.  
शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर मशागत आटोपून आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार नैर्ऋत्य मोसमी पाऊस काहीसा लांबेल अशी शक्यता असताना आता मान्सून तब्बल १५ दिवसांपर्यंत उशिराने कोसळू पाहात असल्याने पावसाचे दमदार आगमन आणि त्याच्या सातत्याने कोसळण्यासंदर्भात बळीराजा हवामान खात्याचे अंदाज पडताळू लागला आहे. दरम्यान, कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी कोयनेच्या पाणीसाठय़ाची तूर्तास तरी चिंता नको, सध्याच्या पाणीसाठय़ापेक्षाही यापूर्वी कमी पाणीसाठा राहिला आहे. असे असतानाही शेतीसाठी व नित्याच्या वापरासाठी कोयनेचा पाणीसाठा दिलासा देणाराच ठरला असल्याचे म्हटले आहे. गतवर्षीच्या तुलनेतील उपयुक्त पाणीसाठा पाहता गतवर्षी तब्बल तिप्पट उपयुक्त पाणीसाठा कोयनेत उपलब्ध होता. अशातच सातारा जिल्ह्याच्या अनेक गावांत व वाडय़ावस्त्यांवर पाणीटंचाई आ वासून आहे. ऐन पावसाळय़ात ७६ गावे व सुमारे १२० वाडय़ांना जवळपास ६० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे ऊसपिकावर भर देणारा कृष्णा, कोयना नद्यांचा काठ पाऊसमान नसल्याने गोंधळात पडला आहे. मान्सूनने दमदार आगमनासाठी बराच विलंब केल्याने खरीप हंगामावर विपरीत परिणामाचे अरिष्ट ओढवण्याची भीती गडद होत चालली आहे. सातारा जिल्ह्यातील १० टक्के लोक पाणीटंचाईच्या कचाटय़ात सापडले आहेत. पाणी टँकरच्या खेपावर खेपा मंजूर करणे प्रशासनास भाग पडले आहे. तर गेल्या सव्वा महिन्यापासून वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने नुकसानीचा तडाखा देताना अंगावर वीज कोसळून चार जणांचा बळी गेला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास दुष्काळी माण, खटाव, फलटण व खंडाळय़ासह हिरव्यागार कृष्णा, कोयनाकाठीही भीषण परिस्थिती ओढवण्याची चिन्हे आहेत.  

Story img Loader