लातूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १ ते ४ मे या कालावधीत मुंबई येथे महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील आठ महसूल विभागांत महाराष्ट्रातील ६५ गडांवरील माती व नद्यांचे जल घेऊन त्याची यात्रा काढण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथून २८ एप्रिलपासून यात्रेची सुरुवात होईल. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे यात्रेचे मराठवाड्याचे समन्वयक आहेत. पत्रकार परिषदेस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, विक्रम काळे, मकरंद सावे, व्यंकट बेद्रे, अफसर शेख आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, ‘मराठवाड्यातली यात्रा नरसी नामदेव, हिंगोली, औंढा नागनाथ, झिरो फाटा, वसमत व नांदेड व त्यानंतर लोहा येथे मुक्कामी राहणार आहे. दुसऱ्या दिवशी कंधार, जळकोट, उदगीर, लातूर येथे मुक्काम.

औसा, उमरगा, नळदुर्ग येथे मुक्काम राहील. बुधवारी तुळजापूर, धाराशिव, येरमाळा, वाशी फाटा, भूम फाटा व बीड येथे मुक्काम करेल. त्यानंतर गेवराई, अंबड या ठिकाणी यात्रा जाणार आहे. मुंबई येथे जांभळी मैदानात चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. नव्या पिढीसमोर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कसा आणला गेला, त्याच्या हृद्य आठवणी या यात्रेतून जागविण्यात येतील. १ मे रोजी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या वेळी जावेद अख्तरही उपस्थित राहणार आहेत. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते, दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते, अर्जुन पुरस्कारविजेते यांच्यासाठी स्वतंत्र दालन तयार केले जाणार आहे. साहित्य, कला, क्रीडा या विषयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या लोकांची माहितीही नव्या पिढीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

नरेश मस्के यांचे विधान अतिशय चुकीचे

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांसाठी नेहमीच धावून जातात. मात्र, खासदार नरेश मस्के यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे असून, आपण त्याच्याशी सहमत नसल्याचे सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकरी कर्जमाफी हा महायुतीचा निर्णय आहे. मात्र, तो राबवण्यासाठी टप्पे ठरवून निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. पवार काका-पुतणे एकत्र येतील का, या प्रश्नावर ते म्हणाले, की बहुजन समाजाच्या हितासाठी एनडीएसोबत जाण्याची आपली भूमिका आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. या भूमिकेला पाठिंबा देण्याचा कोणाचा विचार असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करू, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.