जिल्ह्य़ातील ४००हून अधिक बागायतदारांचे नुकसान

नितीन बोंबाडे, लोकसत्ता 

डहाणू :  ऐन मार्च, एप्रिल, मे महिन्यात गुढीपाडव्यासह, लग्नसराई, यात्रा अशा सण-उत्सवांमध्ये दरवर्षी बाजारपेठांमध्ये लाखोंची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र करोनाच्या संकटामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत  बाजारपेठाच बंद झाल्याने लाखो रुपये खर्च करून  फुलवेल्या  झेंडू फुलबागा  काढून बांधावर फेकू न देण्याची वेळ डहाणू, वाडा, पालघर, विक्रमगड येथील असंख्य शेतकऱ्यांवर आली आहे. सुमारे ४००हून अधिक बागायतदारांना करोनाचा फटका बसला आहे.

डहाणू तालुक्यात बोर्डी, वाणगाव, चिंचणी, ओसार, वाढवण, वरोर, आसनगाव, देदाळे, चंद्रनगर, निकणे, रानशेत यासह पालघर, विक्रमगड, तलासरी या तालुक्यांतही  मोठय़ा प्रमाणात विक्रमी झेंडूच्या बागाची लागवड होते. जवळपास ४००हून अधिक लहानमोठय़ा बागायतदारांमधून अंदाजे ३०० हेक्टरवर झेंडू बागा लागवडीखाली लावल्या जातात.

कलकत्ता रेड  (अष्टगंधा), पिवळ्या रंगाचे अ‍ॅरोगोल्ड या झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. कलकत्ता रेडला जास्त दर मिळतो. तर पिवळी मोठय़ा आकाराची फुले अधिक आकर्षक दिसतात. या भागात या फुलांना चांगली मागणी आहे. जेव्हा सण येतात तेव्हाच फुलांना  मागणी असते. त्यामुळे लग्नसराई, गुढीपाडवा, यात्रा, जत्रा उत्सवाला मागणी लक्षात घेऊन  शेतकरी झेंडूची लागवड करतात. शेताच्या बांधावर झेंडूची लागवड करून लहान शेतकरी सणासुदीला झेंडूची फुले विक्री करून पैसे कमवताना दिसतात. फुलांच्या विक्रीमधून चांगले उत्पन्न पदरात पडेल या आशेने दररोज शेतमजुरांसह  संपूर्ण कुटुंबासह बागकामात गुंतून घेतात. बियाणांसह खत, कीटकनाशक, पाणी, मजुरी यांवर मोठा खर्च केला जातो.   या वर्षीही झेंडू्च्या फुलांचे उत्पादन चांगले आले आहे.  मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या टाळेबंदीमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या आणि फुलांची खरेदी बंद झाली.  शेतकऱ्यांनी रंगवलेल्या स्वप्नांचा त्यामुळे चुराडा झाला आहे. मोठय़ा  बागायतदाराला १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

झेंडुच्या फुलांची बाग फुलवण्यासाठी ४० एकरच्या जागेत  सहा प्लॉट टाकले जातात.  परिसरातील सर्व जमीन भाडेपट्टय़ावर घेऊन झेंडूच्या फुलांची लागवड आम्ही करतो.  यासाठी सुमारे १० ते १२ लाखांचा खर्च येतो. गुढीपाडव्यासाठी ३० ते ४० टन फुले तयार झाली होती, परंतु बाजारपेठ बंद असल्यामुळे सर्व पीक वाया गेले आहे. 

– कल्पेश दत्तू पाटील,  कासा

Story img Loader